शिवनगर : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना राज्यात अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जातो. कारखान्याची विस्तारवाढ पाहता कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शाश्वत उसाचे उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. याचाच विचार करून उपमुख्यमंत्री व कारखान्याचे अध्यक्ष अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्षेत्रातील उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी विशेष योजना राबविण्याचे ठरल्याची माहिती संचालक नितीन सातव यांनी दिली. (Pune Latest News)
ऊस उत्पादनवाढीसाठी नेमलेल्या समितीत संचालक योगेश जगताप, रणजित जाधवराव, स्वप्निल जगताप, विजय तावरे, अविनाश देवकाते, जयपाल देवकाते, देविदास गावडे, कार्यकारी संचालक अशोक पाटील, ऊसविकास अधिकारी सुरेश काळे आदींचा समावेश असल्याचे सातव यांनी सांगितले.
कारखान्याच्या मालकीच्या 4 एकर क्षेत्रामध्ये ऊसबेणे मळा केला आहे. सदर मळ्यामध्ये पीडीएन 15012 व पीडीएन 13007 जातीच्या बेण्यांची प्रत्येकी 2 एकरवर लागवड करण्यात आली आहे. या प्लॉटमधून ऊसरोपे तयार करून कार्यक्षेत्रातील 200 एकर क्षेत्रासाठी सभासदांच्या मागणीनुसार लागण हंगाम 2025-26 मध्ये या रोपांचा रोखीने पुरवठा करण्यात येणार आहे. कार्यक्षेत्रातील आडसाली ऊसलागवडीसाठी लागण हंगाम 2026/27 मध्ये को एम 86032 जातीची रोपे उपलब्ध करण्यात येणार आहेत. कारखाना पाडेगाव संशोधन केंद्र व व्हीएसआय पुणे यांच्याकडून मूलभूत बेणे खरेदी करून ऊसरोपे तयार करणार आहे. सदरची ऊसरोपे सहभागी सभासदांना उधारीने पूर्वहंगाम सन 2025-26 साठी प्रतिएकरी पाच हजार याप्रमाणे देण्यात येणार आहेत. रोपांची लागवड कारखाना ऊसविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली करायची आहे.
सदर पायाभूत ऊस बेणे प्लॉटपासून सहभागी सभासदांनी स्वतः ऊसरोप तयार करावयाची आहेत. यासाठी लागणारे कोकोपीट, पॉली ट्रे साहित्य कारखाना उधारीने सभासदांना देणार आहे.
1) उसाचे उत्पादन प्रतिएकरी 10 टन वाढ करणे
2) कारखाना कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र अधिकचे 3000 एकरने वाढविणे
3) कारखाना कार्यक्षेत्रात शाश्वत 10 लाख टन ऊसगाळपास निर्माण करणे
1) कार्यक्षेत्रातील जमिनीची सुपीकता वाढविणे
2) शाश्वत ऊसबेणे मळा निर्माण करणे
3) संजीवनी सेंद्रिय खत प्रकल्प विस्तारवाढ करणे
4) ठिबक सिंचन योजना राबविणे
5) विक्रमी ऊस उत्पादकांसाठी प्रोत्साहनपर योजना राबविणे
6) कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान योजनेचा आढावा घेणे
7) लागण नियोजन धोरणानुसार ऊसतोडणी कार्यक्रम राबविणे