

शिवनगर; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात अनेक साखर कारखाने 'हाय रिकव्हरी झोन'मध्ये आहेत. त्या ठिकाणच्या वातावरणामुळे तेथे उच्च प्रतीचा साखर उतारा मिळतो. परंतु मागील गाळप हंगामातील तेथील साखर कारखान्याच्या ऊस दराचा विचार केल्यास त्यांच्या तुलनेने माळेगाव सहकारी साखर कारखान्याने राज्यात उच्चांकी ऊसदर दिला असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी केले.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची 67 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. 30) किरकोळ गोंधळ वगळता खेळीमेळीत झाली. या वेळी सभासदांनी सत्ताधारी संचालक मंडळाला धारेवर धरले. या वेळी ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे, रंजन तावरे, उपाध्यक्ष सागर जाधव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, अॅड. केशवराव जगताप, मदननाना देवकाते, सुरेश खलाटे, योगेश जगताप, नितीन सातव, राजेंद्र ढवाण आदींसह ऊस उत्पादक शेतकरी सभासद उपस्थित होते.
अध्यक्ष तावरे म्हणाले, राज्यात साखर उद्योगात माळेगाव साखर कारखान्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. गत गाळप हंगामात कारखान्याचे विक्रमी गाळप झाले, तसेच इतरही उपपदार्थ निर्मितीतून दर्जेदार आणि विक्रमी उत्पादन घेतले. कारखान्याची झालेली विस्तार वाढ लक्षात घेता अधिकचे गाळप होणे गरजेचे आहे. उत्पादित साखर साठवून ठेवण्यासाठी साखर गोडावूनची गरज असल्याने जवळपास तीन ते साडेतीन लाख साखर पोती बसतील, अशाप्रकारचे गोडावून बांधण्याचे काम सुरू केले आहे.
तसेच सभासदांच्या आरोग्यासाठी विमा पॉलिसी योजना राबवली आहे. यामध्ये 11 हजार 319 सभासदांनी भाग घेतला, तर 1349 विमाधारक सभासदांना याचा 6 कोटी 29 लाख रुपयांचा लाभ झाला. विमा पॉलिसीचा हप्ता 5 कोटी 61 लाख दिला आहे. तसेच 2 कोटी 5 लाख रुपयांची स्क्रॅप विक्री केली. संजीवनी खत प्रकल्पाच्या माध्यमातून अधिकचे उसाचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न असल्याचे तावरे यांनी नमूद केले.
या वेळी दिलीपराव ढवाण, विलास सस्ते, अॅड. शाम कोकरे, विकास जगताप, युवराज तावरे, सुखदेव जाधव, अशोकराव जाधव, पोपट निगडे, अॅड. रोहन कोकरे, सोपान देवकाते, ज्ञानदेव बुरुंगले, अशोक खामगळ, वैभव बुरुंगले यांनी मते मांडली. स्वागत कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप यांनी तर अहवाल वाचन कार्यालयीन अधीक्षक जवाहर सस्ते यांनी केले.
कामगारांकडून संचालक मंडळाचा सत्कार
या वेळी गत हंगामात कारखान्याचे विक्रमी गाळप झाल्यामुळे साखर कामगारांना एकूण 15 दिवसांचा पगार बक्षीस म्हणून दिला, तसेच रजेचा पगार सुरू केला आहे. त्यामुळे कारखाना कमगारांच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब तावरे आणि संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला.
अभ्यासपूर्ण भाषणाने जिंकली सभासदांची मने
या वेळी सभासद मदननाना देवकाते, सुनील पवार, दशरथ राऊत, अरविंद बनसोडे, राजेश देवकाते, रोहित जगताप, प्रकाश सोरटे, रोहन देवकाते आदींच्या अभ्यासपूर्ण भाषणाने सभासदांची मने जिंकली.
…आणि चंद्रराव तावरे यांनी केले आरोपांचे खंडन
या वेळी सत्ताधारी संचालक मंडळाने आधीच्या संचालक मंडळावर कारखाना कर्जाबाबत केलेले आरोप ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांनी कारखान्याचे वित्त व लेखा अधिकारी तुकाराम देवकाते यांना सभेसमोर बोलावून घेत घेतलेल्या तसेच फेडलेल्या आणि उर्वरित कर्जाबाबत खुलासा करण्यास सांगून सत्ताधार्यांनी कर्जाबाबत केलेल्या आरोपांचे खंडन केले.
कारखाना शेती विभागाच्या भोंगळ कारभाराचे वाभाडे
सभेत अनेक ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी कारखाना शेती विभागाच्या कामकाजाचे वाभाडे काढत गंभीर आरोप केले. जर अशा अधिकारी, कर्मचार्यांमुळे सभासदाला त्रास होऊन कारखान्याचे नुकसान होत असेल तर दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.