

वडगाव मावळ : स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी समन्वय साधून स्थानिक पातळीवर निर्माण होणार्या समस्यांवर मार्ग काढून गावातील रखडलेल्या विकासकामांना गती द्यावी, अशी सूचना आमदार सुनील शेळके यांनी ग्रामपंचायत आढावा बैठकीत केली.
मावळ पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झालेल्या बैठकीत ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, गटविकास अधिकारी व इतर शासकीय अधिकारी यांची एकत्रित आढावा बैठक घेऊन गावातील समस्या व विकासकामे यावर चर्चा करण्यात आली. बैठकीस गटविकास अधिकारी सुधीर भागवत, कृषी अधिकारी संताजी जाधव, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शोभा कदम, मंडल अधिकारी, गावकामगार तलाठी उपस्थित होते.
विविध विषयांवर चर्चा
यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मालमत्तेच्या नोंदी करणे, 100 टक्के करवसुली नियोजन करणे, गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, स्मशानभूमीची कामे मार्गी लावणे, रस्त्याची कामे मार्गी लावणे आदी विषयांवरील ग्रामपंचायत स्तरावरील अडचणींचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक विभागाचे अधिकारी समोरासमोर असल्याने ग्रामपंचायत स्तरावरील विकासकामे मार्गी लावण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. दिवसभरात आंबी, नवलाख उंब—े, नाणोलीतर्फे चाकण, आंबळे, साते, कान्हे, कामशेत, कुसगाव खु., या गावांची सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रत्येक गावाची वेगवेगळी आढावा बैठक घेण्यात आली. दरम्यान, गावाच्या विकासाचे गांभीर्य नसल्यामुळे काही सदस्य बैठकीस उपस्थित राहिले नसावेत, अशी टिप्पणी करत आमदारांनी या वेळी नाराजी व्यक्त केली.