

Gambling Raid Khed Police
राजगुरुनगर : ठाकूर पिंपरी (शिवलेवस्ती), ता. खेड येथे सुरू असलेल्या बेकायदा तीनपत्ती जुगार अड्ड्यावर खेड पोलिसांनी शुक्रवारी (दि. २७) दुपारी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत १० मुख्य आरोपींसह १५ ते २० जणांना जुगार खेळताना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे २८ लाख १८ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ठाकूर पिंपरी येथील बाळू विष्णू शिवले यांच्या पत्राशेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्याच्या पथकाने दुपारी सुमारे पावणेपाच वाजता छापा टाकला. पोलिस हवालदार सुनील ज्ञानेश्वर बांडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंगझडतीदरम्यान काही आरोपींकडून रोख रक्कम व पत्ते जप्त करण्यात आले. त्यामध्ये सतिश धोतरे, शंकर धोतरे, दिगंबर परांडे, धनंजय भिसुरे, ब्रह्मानंद माळी, संतोष पवार, रोहित धोतरे आदींचा समावेश आहे. यांच्याकडून प्रत्येकी ५०० ते १,००० रुपयांदरम्यान रोख रक्कम आणि तीनपत्तीचे पत्ते जप्त करण्यात आले. तसेच ठिकाणी ठेवलेल्या पत्त्यांच्या डेकमधून ३३ पत्तेही जप्त करण्यात आले.
कारवाईदरम्यान १० पत्त्यांचे कॅट, जुगारासाठी वापरलेले ५ गोल प्लायवूड टेबल, ४० प्लास्टिक खुर्च्या आणि मोठ्या प्रमाणावर वाहने जप्त करण्यात आली. एकूण ४० हून अधिक वाहनांमध्ये दोन फॉर्च्युनर, एक इनोव्हा, स्विफ्ट, आय-२०, बलेनो, सॅंट्रो, वॅगनआर यांसारख्या कार तसेच स्प्लेंडर, पॅशन, अॅक्टिव्हा, शाईन यांसारख्या दुचाकींचा समावेश आहे. दोन रिक्षाही जप्त करण्यात आल्या.
पोलिसांच्या माहितीनुसार, या जुगार अड्ड्याचे मुख्य आयोजक म्हणून बाळू शिवले, बाबू ढमाले आणि नवनाथ धोत्रे यांची नावे समोर आली आहेत.
स्थानिक नागरिकांना या अड्ड्यामुळे त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती असून भीतीमुळे कोणी तक्रार करण्यास धजावत नव्हते. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई केली. पुढील तपास सुरू असून आणखी काही संशयितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.