शिरूर लोकसभेसाठी भाजपकडून महेश लांडगे यांचा आग्रह

शिरूर लोकसभेसाठी भाजपकडून महेश लांडगे यांचा आग्रह

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून कोण उमेदवार याबाबतचा घोळ काही संपता संपेना. महायुतीकडून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव, भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या नावांची चर्चा आहे. भाजपच्या सर्व्हेनुसार महेश लांडगे यांच्या नावाला जास्त पसंती मिळत आहे. शिवसेनेने या मतदारसंघात जर जास्तच आग्रह धरला, तर आढळराव यांना राज्यसभेचे आश्वासन दिले जाऊ शकते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोमवारी झालेल्या मंचर येथील सभेच्या ठिकाणी मंगलदास बांदल यांनी व्यासपीठावर अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणे केल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. महायुतीत शिरूरमध्ये नेमकी उमेदवारी कोणत्या पक्षाला मिळते आणि उमेदवार कोण असेल याबाबत मात्र उलट-सुलट चर्चा ऐकायला मिळत आहे. राष्ट्रवादीकडून भोसरीचे माजी आमदार विलास लांडे इच्छुक असले तरी त्यांनी मला उमेदवारी द्यायची नसेल तर बाहेरच्या पक्षातून उमेदवार आयात करण्यापेक्षा भोसरीचे भाजपचे आ. महेश लांडगे यांना उमेदवारी द्यावी, असे सांगत जणू काही आपला पाठिंबा महेश लांडगे यांनाच दर्शविला आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारीच्या या घोळाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी चांगलाच आवाज उठवला आहे. मतदारांशी संपर्क साधण्यात त्यांनी आघाडी मारल्याचे दिसत आहे. खा. कोल्हे गेल्या चार वर्षांत मतदारसंघात फिरकलेच नाहीत, अशी टीका होत होती, परंतु दिवाळीपासून ते मतदारसंघात तळ ठोकून आहेत. एवढेच नाही तर विविध कार्यक्रमाला त्यांची हजेरी पाहायला मिळते. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर ते आक्रमक होत आहेत. अजित पवार यांच्या आंबेगाव तालुक्याच्या दौर्‍यात आढळराव यांचा सहभाग पाहता राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव आढळराव उमेदवार असू शकतात, अशी ही चर्चा पुढे येऊ लागली आहे. तथापि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या डोक्यात हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडेच असायला हवा असाच प्रयत्न सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news