माहेर संस्थेमुळे साडेआठ वर्षांनी झाली माय-लेकरांची भेट

माहेर संस्थेमुळे साडेआठ वर्षांनी झाली माय-लेकरांची भेट

कोरेगाव भीमा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शिक्रापूर (ता. शिरूर) येथे सन 2015 मध्ये बेवारस आढळलेल्या महिलेला शिरूर तालुक्यामध्ये अनाथांसाठी कार्य करणार्‍या माहेर संस्थेमध्ये दाखल करण्यात आले होते. माहेर संस्थेच्या प्रयत्नामुळे सदर महिलेला आठ वर्षे पाच महिन्यांनी तिची मुले भेटली. दीर्घ कालावधीनंतर आईला पाहून त्यांची मुलेदेखील गहिवरून गेली. शिक्रापूर येथे आठ वर्षांपूर्वी एक महिला बेवारस आढळली होती. सदर महिलेला माहेर संस्थेत दाखल करण्यात आले.

संस्थेने तिच्यावर औषधोपचार करत तिच्या पालकांबाबत विचारपूस केली. परंतु, भाषेची अडचण येत होती. सदर महिलेने तिचे नाव मल्लिकाराणी सांगितले. तिला तमीळ भाषा येत असल्याचे निदर्शनास आल्याने माहेर संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या शर्ली अँथनी यांनी महिलेशी चर्चा वाढवून वेळोवेळी विचारपूस करून तिचे नाव व पत्त्याबाबत माहिती काढली तेव्हा सदर महिला तामिळनाडूतील असल्याचे निश्चित झाले.

'माहेर'च्या संस्थापिका लुसी कुरियन यांच्या माध्यमातून पोलिसांच्या मदतीने मल्लिकाराणीच्या कुटुंबीयांशी जुलै 2023 मध्ये संपर्क झाला. त्यांना मल्लिकाराणीचे फोटो दाखवल्यानंतर मुलांची ओळखदेखील पटली. त्यानंतर शुक्रवारी (दि. 4) मल्लिकाराणी यांची मुरली व मंगेश ही मुले माहेर संस्थेत आली. आईला पाहून मुलांनादेखील गहिवरून आले.

साडेआठ वर्षांनी झालेली माय-लेकरांची भेट पाहून संस्थेतील पदाधिकार्‍यांनीदेखील समाधान व्यक्त केले. तब्बल आठ वर्षे पाच महिने आपल्या आईला व्यवस्थितपणे सांभाळून आज आमची भेट घडवून आणल्याने मल्लिकाराणी यांच्या मुलांनीदेखील माहेर संस्थेचे आभार मानले. अनाथांचे संगोपन करून पुनर्वसन करण्याचे काम करत असताना एका महिलेला आठ वर्षांनी तिचे कुटुंब मिळाले याचा आम्हाला आनंद होत असल्याचे लुसी कुरियन यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news