Pune Assembly Elections 2024: पुण्यात महायुतीचे वर्चस्व; महाविकासला एकच जागा

शहरातील विधानसभेच्या आठपैकी सात जागा मिळवित महायुतीने दणदणीत विजय मिळविला.
Pune Assembly Elections 2024
पुण्यात महायुतीचे वर्चस्व; महाविकासला एकच जागाPudhari
Published on
Updated on

Pune News: शहरातील विधानसभेच्या आठपैकी सात जागा मिळवित महायुतीने दणदणीत विजय मिळविला. यामध्ये भाजपने सर्वच्या सर्व सहा जागा पुन्हा जिंकल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळविला. वडगाव शेरीची जागा जिंकत महाविकास आघाडीने अस्तित्व टिकविले. राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे, तर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

महायुतीमधून भाजपने कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, खडकवासला आणि कसबा पेठ या सहा जागा लढविल्या होत्या. त्यात कोथरूडमधून चंद्रकांत पाटील यांनी सलग दुसर्‍यांदा विजय मिळविला. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे यांचा तब्बल 1 लाख 11 हजार 545 इतक्या विक्रमी मतांनी पराभव केला. कोथरूडमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा विक्रम पाटील यांच्या नावावर नोंदविला गेला.

Pune Assembly Elections 2024
Pune Elections 2024: पुणे जिल्ह्यात महायुतीची मविआला धोबीपछाड

तर पर्वती मतदारसंघातून आमदार माधुरी मिसाळ यांनी सलग चौथ्यांदा ऐतिहासिक विजय मिळविला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या आश्विनी कदम यांचा 54 हजार 660 मतांनी पराभव केला. मिसाळ यांनी आत्तापर्यंतचा सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा विक्रम केला. या मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार आबा बागूल यांना अवघी दहा हजार मते मिळाली.

खडकवासला मतदारसंघात उमेदवारीसाठी संघर्ष कराव्या लागलेल्या भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांनीही सलग चौथ्यांदा विजयी होण्याचा विक्रम केला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सचिन दोडके यांचा 52 हजार 322 मतांनी पराभव केला. गत निवडणुकीत तापकीर हे अवघ्या अडीच हजार मतांनी विजयी झाले होते. याच मतदारसंघातील मनसेचे उमेदवार मयूरेश वांजळे यांनी तब्बल 42 हजार 897 इतकी लक्षवेधक मते घेतली.

भाजपसाठी सर्वात धोक्याची जागा समजल्या जाणार्‍या पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातही आमदार सुनील कांबळे यांनी तब्बल 10 हजार 256 मतांनी अनपेक्षित मताधिक्य घेऊन विजय मिळविला. त्यांनी काँग्रेसच्या रमेश बागवेंचा पराभव केला. याठिकाणी वंचितचे नीलेश आल्हाट यांना 8 हजार 849 इतकी मते मिळाली.

तर पोटनिवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठ मतदारसंघात भाजपने पुन्हा मुसंडी मारत कसब्याचा गड जिंकला. भाजपचे हेमंत रासने यांनी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा तब्बल 19 हजार 423 मतांनी पराभव केला. तर मनसेचे गणेश भोकरे यांना 4 हजार 894 आणि काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार कमल व्यवहारे यांना अवघी 552 इतकी मते मिळाली. कसबा पेठेत विजय मिळवत भाजपने पोटनिवडणुकीतील पराभवाची परतफेड केली.

Pune Assembly Elections 2024
रामराजेंच्या राजकारणाचा झालेला अस्त आनंददायी : आ. जयकुमार गोरे

शिवाजीनगर मतदारसंघातही भाजपचे आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी सलग दुसर्‍यांदा विजय मिळवत गड राखला. त्यांनी काँग्रेसचे दत्ता बहिरट यांचा 36 हजार 702 मतांनी पराभव केला. याठिकाणी काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांनी घेतलेली 13 हजार 61 मते लक्षवेधक ठरली. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली हडपसरची जागा कायम राखत आमदार चेतन तुपे यांनी विजय मिळविला. त्यांनी राष्ट्रवादी पवार गटाचे प्रशांत जगताप यांचा 7 हजार 122 मतांनी पराभव केला.

तर राष्ट्रवादी काँग्रेसकडील दुसरी जागा असलेल्या वडगाव शेरीत मात्र आमदार सुनील टिंगरे यांना धक्कादायकरीत्या पराभवाला सामोरे जावे लागले. विसाव्या फेरीअखेरपर्यंत आघाडीवर असलेल्या आमदार टिंगरे यांच्यावर अखेरच्या साडेतीन फेर्‍यांत राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे बापूसाहेब पठारे यांनी 4 हजार 710 मतांनी विजय मिळविला. पठारे यांच्या विजयाने महाविकास आघाडीच्या पारड्यात एक जागा पडली. मात्र, अखेरच्या क्षणापर्यंत निकाल अत्यंत चुरशीचा ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news