

खटाव : माण-खटावच्या मायबाप जनतेने विकासकामांना, दुष्काळमुक्तीसाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नांना महत्व दिले. माझे सर्व कुटुंबीय, सहकारी, लाडक्या बहीणी आणि जनतेच्या आशिर्वादाने आजचा विजय झाला. गेल्या अनेक वर्षांपासून जाती जातीत विष पसरवणारी, तालुक्या तालुक्यात, गावागावात द्वेष पसरवणारी प्रवृत्ती जनतेने आज हद्दपार केली. इकडे माझा विक्रमी विजय आणि तिकडे रामराजेंच्या विकृत राजकारणाचा झालेला अस्त अधिक आनंददायी असल्याची प्रतिक्रिया आ. जयकुमार गोरे यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीतील सलग चौथ्या विजयानंतर बोलताना आ. गोरे पुढे म्हणाले, माझ्या विरोधकांनी माझा खूप द्वेष केला. त्यांनी कोणतेही विकासकाम केले नाही. त्यांना माण-खटावच्या मातीत आलेल्या पाण्याबद्दल प्रेम नाही. त्यांना जनतेच्या सुख दु:खाचे काही देणेघेणे नाही. असे विरोधक मला गेल्या चार निवडणुकांमध्ये अडवायचा प्रयत्न करत आहेत. जनतेने त्यांना जोरदार चपराक लगावली आहे. भाजपचे अडीच वर्षातील भरीव काम, देवेंद्र फडणवीस यांनी माण-खटावच्या पाणीप्रश्नासाठी कायदे बदलून केलेले फेर जलनियोजन, पाणीयोजनांसाठी दिलेला भरघोस निधी याबाबी माझ्या विजयात जमेच्या ठरल्या.
सातारा जिल्हा पवारांच्या पाठिशी राहिला, मात्र त्यांनी जिल्ह्यासाठी काहीच केले नाही. उशीरा का होईना जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुफडासाफ झाला. ज्या माणसाने जिल्ह्यात नेहमी द्वेषाचे राजकारण केले, जो माणूस जिल्ह्याचे पाणी पळवून नेणार्यांसोबत राहिला, जो माणूस जिल्ह्याच्या विकासाच्या आड येत राहिला, ज्या माणसाने स्वतः सत्तेत राहण्यासाठी जिल्हा वार्यावर सोडला त्या रामराजेंच्या राजकारणाचा आणि त्यांच्या विकृत प्रवृत्तीचा अस्त झाल्याचा आज मोठा आनंद होत आहे.
आ. गोरे पुढे म्हणाले, माझ्या विरोधकांनी द्वेषाचे आणि तुष्टीकरणाचे राजकारण केले. माझ्यावर अनेक आरोप केले, पण जनतेने त्यांना तोंडघशी पाडले. माण-खटावला पाण्याची गरज होती, पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे होते. कोविडमध्ये मी हजारो रुग्णांवर मोफत उपचार केले, मात्र विरोधकांनी खालच्या दर्जाचे राजकारण करुन माझ्यावर आरोप केले. माझ्या वडिलांच्या आजारपणाबद्दल उलटसुलट चर्चा केल्या. माझे विरोधकांना सांगणे आहे की, आपण राजकारण मैदानात करु, पण विनाकारण कुटुंबाकडे येवू नका, त्यावेळी आम्ही स्वस्थ बसणार नाही. माझे कुटुंब नेहमीच माझ्या पाठिशी राहिले आहे. काही वैचारिक मतभेत होते. वडील, आम्ही सर्व भाऊ, बहीण, पत्नी आणि कुटुंबीय एकत्र आणि ठाम आहोत. कुटुंबाबरोबरच सर्व सहकारी आणि भाजप पक्ष पाठिशी राहिल्याने मतदारसंघातील आजपर्यंतचा सर्वात मोठा विजय साकार झाला आहे.