

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : महावितरणच्या सोमेश्वरनगर उपविभागात तब्बल 39 कोटी 23 लाख थकबाकी असल्याने महावितरणने 13 हजार 301 वीजजोडणींपैकी तब्बल 1800 शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. पाणी असूनही शेतीला पाणी देण्यास शेतकर्यांना विजेअभावी अडचण येत आहे. याबाबत उपकार्यकरी अभियंता सचिन म्हेत्रे यांनी माहिती दिली. सन 2021 साली सरकारने सुरू केलेल्या कृषी संजीवनी योजनेंतर्गत शेतकर्यांना 50 टक्के वीजबिलात सूट देण्यात आली होती. या योजनेत सहभाग घेतल्यानंतर दोन वर्षांत जवळपास 90 टक्के ग्राहकांनी वीजबिल भरले नाही, त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याचा पवित्रा महावितरणने घेतला आहे.
महावितरणने सप्टेंबर 2020 पूर्वी असलेल्या शेतीपंपाच्या थकबाकीवर 30 टक्के सूट दिली होती. 39 कोटी 23 लाख ही जुनी थकबाकी असून, सप्टेंबर 20 पासून आजपर्यंत असणार्या थकबाकीवर शेतकर्यांना महावितरणकडून 30 टक्के सवलत मिळणार असून, 1 एप्रिलनंतर या थकबाकीमध्ये कोणत्याही प्रकारची सूट मिळणार नाही. 13 हजार 301 थकबाकीदार शेतकर्यांपैकी महावितरणने सोमेश्वर उपविभागीय केंद्रांतर्गत येणार्या कोर्हाळे, मोरगाव, नीरा, सोमेश्वर, सुपे आणि वडगाव या गावातील शेतीपंपांची तब्बल 1800 ग्राहकांची वीज खंडित केली आहे.
वीजबिल थकीत असल्यामुळे ग्रामपंचायतीला वीजपुरवठा करणार्या विद्युत पंपांचाही वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. मुरुम येथे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. वाघळवाडी ग्रामपंचायतीने संपूर्ण वीजबिल भरल्याने ही ग्रामपंचायत थकबाकीमुक्त ठरली आहे. वाढते ऊन आणि शेतीतील पिकांना पाण्याची असलेली आवश्यकता लक्षात घेऊन महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.