

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी आता कोणाची निवड होणार, याकडे लक्ष लागले आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सर्वसमावेशक चेहर्याला शहराध्यक्षपदाची संधी दिली जाऊ शकेल. येत्या शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे दौर्यात त्यावर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी नुकताच शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. एकीकडे आगामी महापालिका निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असतानाच आणि राज्य सरकारने निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली असतानाच राष्ट्रवादीला मात्र पुण्यात शहराध्यक्षच नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे. (Latest Pune News)
त्यामुळे रिक्त असलेल्या शहराध्यक्षांची निवड लवकरात लवकर करावी लागणार असल्याचे स्पष्ट आहे. मानकरांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री पवार पहिल्यांदाच येत्या शनिवारी पुण्यात येणार आहेत. त्या वेळी अध्यक्षपदाबाबत चर्चा होऊ निर्णय होऊ शकतो, असे राष्ट्रवादीतील सूत्रांकडून सांगण्यात आले.
शहराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडे मोजक्याच काही नावांची सध्या चर्चा आहे. त्यात आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे, माजी महापौर दत्ता धनकवडे, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख अशी नावे चर्चेत आहेत. याव्यतिरिक्त काही माजी नगरसेवक व पदाधिकारी यामधून अनपेक्षित नाव पुढे येण्याची शक्यता आहे. शहराध्यक्षाची निवड करताना प्रामुख्याने महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच शहराध्यक्षपदाच्या चेहर्याची निवड केली जाईल, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.