महात्मा फुले जयंती विशेष : ’समता भूमी’चे विस्तारीकरण कासव गतीने

महात्मा फुले जयंती विशेष : ’समता भूमी’चे विस्तारीकरण कासव गतीने
Published on
Updated on

पुणे : महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे निवास्थान असलेल्या गंज पेठेतील फुले वाड्याच्या (समता भूमी) विस्तारीकरणासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद करूनही याचा प्रवास मात्र कासव गतीने सुरू आहे. दुसरीकडे भिडे वाडा स्मारकाचे कामही लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकले आहे.

समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले आणि मुलींची शाळा सुरू करणार्‍या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे गंज पेठेतील फुले वाडा येथे वास्तव्य होते. हा परिसर 'समता भूमी' म्हणून ओळखला जातो. या परिसरातील फुले वाडा राज्य शासनाच्या हेरीटेज विभागाच्या ताब्यात आहे. तसेच महापालिकेच्या वतीने याच परिसरात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक तयार करण्यात आले आहे. फुले दाम्पत्याच्या जयंती आणि स्मृतीदिनी राज्य आणि देशातून माळी समाजासह विविध जाती धर्माचे लोक त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी 'समता भूमीत' येतात. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले देशाच्या अस्मिता आहेत.

त्यांचे कार्य प्रेरणादायी असून, ते नव्या पिढी समोर येण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी 'समता भूमी'चे विस्तारीकरण करण्याची आणि फुले वाडा-सावित्रीबाई फुले स्मारक जोडण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार 'समता भूमी'च्या विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाच्या आसपास झोपडपट्टी व दाट लोकवस्ती आहे. त्यामुळे 'समता भूमी'च्या विस्तारीकरणाच्या कामाला गती मिळालेली नाही. स्मारकाचे विस्तारीकरण करण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आग्रही असून, ते वारंवार पाठपुरावा करतात.

त्यानुसार भुजबळ आणि उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात आणि मुंबईमध्ये वारंवार बैठका झाल्या. या कामाला चालना देण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 100 कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे स्मारकाच्या व दोन्ही वास्तू जोडण्याच्या कामास गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, या कामाला फारसी गती मिळालेली नाही. फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक याच्यामध्ये अंदाजे शंभर मीटरचे अंतर आहे. दोन्ही वास्तूंच्या मधील जागेवर नागरिकांची 519 घरे आहेत. दोन्ही वास्तू जोडण्यासाठी या नागरिकांचे स्थलांतर करून भूसंपादन करावे लागणार आहे. हे भूसंपादन करून देण्याचे काम महापालिकेला करावे लागणार आहे. हे भूसंपादन झाल्यानंतर दोन वास्तू जोडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

तत्पूर्वी महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यात बदल करावा लागणार आहे. हा बदल करण्यासाठी राज्य शासनाच्या टाऊन प्लॅनिंग विभागामार्फत नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. यामध्ये जवळपास सहाशे हरकतींची सुनावणी घेण्यात आली. राज्य शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर विकास आराखड्यात सुधारणा करून भूसंपादन केले जाणार आहे. त्यानंतर महापालिका आराखडा तयार करून काम सुरू करणार आहे. या सर्व प्रक्रियेला काही काळ जाणार आहे.

स्मारकाच्या आराखड्याचे सात प्रस्ताव प्राप्त

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिवाजी रस्त्यावरील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्या भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याची मागणी विविध घटकांकडून अनेक वर्षे केली जात होती. त्यानुसार महापालिकेने स्मारकासाठी वास्तूविशारदांकडून स्मारकाच्या आराखड्याचे प्रस्ताव मागविले आहेत. त्यामध्ये सात प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या प्रस्तावामधून एक प्रस्ताव अंतिम करून निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. मात्र, महापालिकेत नवीन आयुक्तांची नियुक्ती आणि लोकसभा आचारसंहिता यामुळे ही प्रक्रिया थांबली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news