

7 वी खेलो इंडिया युवा स्पर्धा
साईराजचे विक्रमी सोनेरी यश; तनुजालाही सुवर्ण
Pune : मनमाडचा साईराज परदेशी याने 7 व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील वेटलिफ्टिंगमध्ये नव्या स्पर्धा विक्रमासह सोनेरी यशाला गवसणी घातली. कराडच्या तनुजा साळुंखे हिनेही वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले. 12 वीच्या परिक्षेमुळे सरावाला काही दिवस ब्रेक दिल्यामुळे तिला नव्या विक्रमाला गवसणी घालता आली नाही.
गतस्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या साईराज परदेशी यांने 81 किलो गटात निर्विवाद वर्चस्व गाजविले. खेलो इंडिया स्पर्धेत 'माझी स्पर्धा ही माझ्याशीच' आहे, हे त्याने दाखवून दिले. त्याने स्नॅचमध्ये तिसर्या प्रयत्नात विक्रमी 140 किलो वजन उचलले. त्यानंतर क्लिन अॅण्ड जर्कमध्ये त्याने दुसर्या प्रयत्नात सर्वाधिक 172 किलो वजन उचलले. तिसर्या प्रयत्नाची गरजही न वाटलेल्या साईराजने एकूण 312 वजनाची कामगिरी करत नव्या विक्रमासह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
रौप्यपदक विजेत्या आंध्र प्रदेशच्या एम तरूणला (स्नॅचमध्ये 126, तर क्लिन अॅण्ड जर्कमध्ये 161 किलो) एकूण 287 वजनाची कामगिरी करता आली. म्हणजेच साईराज त्याच्यापेक्षा तब्बल 25 किलो वजनाने पुढे होता. उत्तर प्रदेशच्या आयुष राणाने (स्नॅचमध्ये 119 किलो, तर क्लिन अॅण्ड जर्कमध्ये 145 किलो) एकूण 264 किलो वजन उचलत कांस्यपदक जिंकले.
नुकताच बारावी पास झालेल्या साईराज परदेशीने 81 किलो गटात नव्या विक्रमासह सुवर्णयश मिळविताना स्वत:चाच विक्रम मोडला. त्याने स्नॅचमधील स्वत:चाच 139 किलोचा विक्रम 140 किलो वजन उचलून मोडीत काढला. हीच कमाल त्याने क्लिन अॅण्ड जर्कमध्येही केली. त्याने या प्रकारातही स्वत:चा 171 किलो वजनाचा विक्रम मोडीत काढताना 172 किलो वजन उचलले. त्यामुळे अर्थातच त्याचा एकूण 312 किलो वजन उचलण्याचाही नवा विक्रम प्रस्थापित झाला. प्रविण व्यवहारे, डी. डी. शर्मा, अलोकेश बर्वा यांचे साईराजला मार्गदर्शन लाभलेले आहे.
‘गेल्या सात वर्षांपासून मला घरापासून लांब ठेवण्यासाठी काळीज घट्ट केलेल्या आई-वडीलांनाच पहिले या सुवर्णयशाचे श्रेय जाते. त्यानंतर मला वेटलिफ्टिंगचे धडे शिकविणारे प्रविण व्यवहारे, त्यानंतर डी. डी. शर्मा व आताचे प्रशिक्षक अलोकेश बर्वा या सर्वांचाही या यशात तितकाच मोलाचा वाटा आहे. आता या खेळात राष्ट्रकुल, आशियाई आणि ऑलिम्पिक स्पर्धा गाजविण्यासाठी मी रक्ताचे पाणी करीन, एवढी ग्वाही नक्की देतो.’
साईराज परदेशी
तनुजा पोळ हिने सुवर्णपदक निश्चित केल्यानंतर क्लिन अॅण्ड जर्कमधील अखेरच्या प्रयत्नात खेलो इंडियातील नव्या विक्रमासाठी 106 किलो वजन उचलण्याचा विडा उचलला. दिल्लीतील राष्ट्रीय शालेय स्पर्धेत तिने स्नॅचमध्ये 75 किलो, तर क्लिन अॅण्ड जर्कमध्ये विक्रमी 105 किलो वजन उचलले होते. मात्र, 12वीच्या परिक्षेमुळे तनुजाच्या सरावात थोडा खंड पडला होता. त्याचा परिणाम तिच्या आजच्या कामगिरीवर झाला. स्नॅचमध्ये पहिल्या प्रयत्नात फाऊल झाल्याने तिला 71 किलोवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे आता क्लिन अॅण्ड जर्कमध्ये विक्रमासह सुवर्णपदक जिंकण्याची तिला संधी होती. मात्र, सरावातील खंडामुळे तनुजाला 106 किलो वजन पेलवले नाही. त्यामुळे तिच्या सुवर्णयशाला विक्रमाचे कोंदण लाभू शकले नाही.
‘मी सम्राट पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे खेलो इंडियातील सुवर्णपदक जिंकले. गतवेळी मला पदकाने हुलकाणी दिली होती. मात्र, यावेळी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा, आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक मिळाल्याने यंदाच्या खेलो इंडियात सुवर्णपदक जिंकण्याचा विश्वास होता. त्यामुळे या सुवर्णयशाने सहाजिकच मला आनंद झालाय.’
तनुजा पोळ
मुलींच्या विभागात दिल्लीतील राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सुवर्ण आणि हिमाचल प्रदेशात झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळविलेल्या तनुजा पोळकडून महाराष्ट्राला खेलो इंडियातही सुवर्णपदकाचीच आशा होती. अपेक्षेप्रमाणे तीने सुवर्णयश मिळविले, पण तीला आपल्या सर्वोत्तम कामगिरीपर्यंत पोहोचता आले नाही. तनुजाने स्नॅचमध्ये 68 किलोच्या पहिल्या प्रयत्नात फाऊल केले. मग दुसर्या प्रयत्नात हे वजन उचलून तिने तिसर्या प्रयत्नात 71 किलो वजन उचलले. क्लिन अॅण्ड जर्कमध्ये तनुजाने दुसर्या प्रयत्नात 100 किलो वजन उचलले.
अशा प्रकारे तिने चुरशीच्या लढतीत एकूण 171 किलो वजन उचलून अवघ्या एक किलो अधिक वजनाने सुवर्णपदकाला गवसणी घातली. आंध्र प्रदेशच्या थरांगिणी कारंगी हिने स्नॅचमध्ये 74, तर क्लीन अॅण्ड जर्कमध्ये 96 किलो असे एकूण 171 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले. आसामची भावना गोगोई हिने (स्नॅचमध्ये 75, तर क्लिन अॅण्ड जर्कमध्ये 92 किलो) एकूण 167 किलो वजन कांस्यपदक मिळविले.