

- वेदिका टोळेला कांस्य पद
- ७ वी खेलो इंडिया युवा स्पर्धा
पुणे : नाशिकच्या मनमाडमधील व्यवहारे कुटुंबियांनी खेलो इंडिया युवा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्याची परंपरा बिहारमध्येही कायम राखली. ७ व्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत आकांक्षा व्यवहारेने ४५ किलो गटात सुवर्ण, तर ठाणेच्या वेदिका टोळेने कांस्य यशाला गवसणी घातली.
राजगीर क्रीडा विद्यापीठाच्या परिसरात सुरू असलेल्या वेटलिफ्टिंग खेळातही पहिल्या दिवसापासून महाराष्ट्राचा डंका पहाण्यास मिळाला. ४५ किलो गटात ९ पैकी ३ स्पर्धेक महाराष्ट्राचे होते. अपेक्षेप्रमाणे आकांक्षाने एकूण १४८ किलो वजन उचलून सोनेरी यश पटकावले. १२७ किलो वजनाची कामगिरी करीत वेदिका टोळेने तिसरे स्थान प्राप्त केले.
आकांक्षाचे हे खेलो इंडिया स्पर्धेतील दुसरे पदक आहे. मध्यप्रदेशमधील २०२३ स्पर्धेत तीने सुवर्णपदक जिंकले होते. गत स्पर्धेत दुखापतीमुळे चौथ्या स्थानावर तीची कामगिरी होती. बिहार स्पर्धेत दुखापतीवर मात करून तीने पदकाचा करिश्मा घडविला.
स्नॅच प्रकारात अपेक्षेप्रमाणे आकांक्षाने दमदार सुरूवात केली. तिसऱ्या प्रयत्नात सर्वाधिक ६८ किलो वजन उचलून आकांक्षाने आपले वर्चस्व गाजवले. पाठोपाठ क्लिन अँन्ड जर्क प्रकारातही सर्वाधिक ८० किलो वजन उचलून आकांक्षाने सुवर्णपदकावर नाव कोरले. वेदिकाने स्नॅच प्रकारात ६० किलोची कामगिरी करीत दुसरे स्थान मिळवले होते. क्लिन अँन्ड जर्क प्रकारात ७० गुणांसह ती मागे पडली. केवळ १ गुणांनी तिचे रौप्य पदक हुकले. पंजाबच्या लव्हजोत कौरने १२८ गुण संपादून रौप्यपदकाचे यश संपादन केले.
नाशिकच्या जय भवानी व्यायाम शाळेत सराव करणाऱ्या आकांक्षा ५ आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळल्या आहे. तीने १९ वर्षांखालील गटात राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकले आहे. प्रविण व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करते. खेलो इंडिया स्पर्धेतील ४५ किलो गटातच मला ऑलिम्पिक पदक जिंकायचे असल्याचे आकांक्षाने सांगितले. मनमाडमधील व्यवहारे कुटुंबियांनी सलग तिसऱ्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्याची किमया घडविली आहे. गतवर्षी आकांक्षाचा भाऊ कृष्णाने सुवर्णपदक पटकावले होते.
वेदिका टोळे हीचे आई वडील हे दोघेही वेटलिफ्टर खेळाडू आहेत. सांगलीच्या राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडू असलेल्या मधुरा सिंहासने यांची ती मुलगी आहे. आवड व सुदृढतेसाठी मी वेटलिफ्टिंग खेळते, खेलो इंडियातील हे पदक माझ्यासाठी बोनस असल्याचे वेदिकाने सांगितले.