पुणे : वाहन खरेदीचा टॅक्स आता 1 जुलै 2025 पासून वाढविण्यात आला आहे. इंधनावरील (पेट्रोल/डिझेल) वाहनांसाठीचा टॅक्स एक टक्क्याने वाढविण्यात आला आहे, तर 30 लाखांपेक्षा अधिक किमतीची ई-वाहने खरेदी करताना आता सहा टक्के टॅक्स भरावा लागणार आहे. यासंदर्भातील आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाकडून काढण्यात आले आहेत.
वाहने खरेदी करताना मोटार वाहन कायद्यानुसार निश्चित केलेली रक्कम टॅक्स स्वरूपात भरावी लागते. याच टॅक्सच्या रकमेत आता वाढ करण्यात आली आहे. येत्या जुलैपासून याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
याबाबत उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले म्हणाले, ‘प्राप्त झालेल्या आदेशानुसार आता इंधनावरील वाहन खरेदी करताना एक टक्के अधिकचा टॅक्स भरावा लागणार आहे, तर ’इलेक्ट्रिक’वरील 30 लाखांपेक्षा अधिक किमतीच्या वाहनाला सहा टक्के टॅक्स भरावा लागणार आहे. पूर्वी ई-वाहने टॅक्स फ—ी होती. आता 1 जुलैपासून 30 लाखांपेक्षा अधिक किंमत असलेल्या ई-वाहनाचा टॅक्स भरावा लागणार आहे.’
नवीन वाहन खरेदी करताना अनेक प्रकारचे कर भरावे लागतात, याचे मुख्य कारण असे आहे की, सरकारला रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी गोळा करायचा असतो. कर का भरावा लागतो, याची मुख्य कारणे:-
पायाभूत सुविधांचा विकास : सरकारला रस्त्यांचे जाळे, पूल, उड्डाणपूल, वाहतूक व्यवस्थापन इत्यादींसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असते. वाहनकरातून मिळणारा पैसा यासाठी वापरला जातो.
प्रदूषण नियंत्रण : काहीवेळा जास्त प्रदूषण करणार्या वाहनांवर जास्त कर लावला जातो; जेणेकरून लोकांना कमी प्रदूषण करणार्या किंवा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्यास प्रोत्साहन मिळावे.
महसूलनिर्मिती : सरकारसाठी हा एक महत्त्वाचा महसूल स्रोत आहे, त्यामुळे देशाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध योजना आणि सेवांसाठी निधी उपलब्ध होतो.
वाहतूक नियमन : करांच्या माध्यमातून वाहनांची संख्या आणि प्रकार नियंत्रित करण्यास मदत होते. म्हणूनच, नवीन वाहन खरेदी करताना आपल्याला हे विविध कर भरावे लागतात, जे देशाच्या विकासात आणि वाहतूक व्यवस्थापन सुधारणेत महत्त्वाचे योगदान देतात.
अंमलबजावणी :
1 जुलै 2025 पासून लागू होणार.
इलेक्ट्रिक वाहने : 30 लाख रुपयांवरील किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर 6 % अतिरिक्त कर.
इंधनावरील वाहने : सर्व इंधनांवरील वाहनांवर 1 % कर वाढ
परिणाम : वाहन खरेदी महागणार
ग्राहकांसह वाहन उद्योगाला फटका बसण्याची शक्यता.