पुणे / जंक्शन: बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीला पुणे ग्रामीणच्या वालचंदनगर पोलिसांनी शनिवारी (दि. 26) दुपारी चारच्या सुमारास अकलूज परिसरातून पकडले. सूरज गोसावी (रा. भवानीनगर सणसर, ता. इंदापूर, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
रात्री उशिरा गुन्हे शाखेचे पथक गोसावीला पुण्यात घेऊन आले. यापूर्वी रवींद्रकुमार कनोजिया (रा. कोंढवा) आणि अख्तर अली शेख (28, रा. कोंढवा, मूळ रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) या दोघांना पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. परंतु गोसावी हा फरार झाला होता. गुन्हे शाखेचे पथक देखील गोसावी याच्या मागावर होते. त्याची ओळख पोलिसांनी पटवली होती, परंतु तो गुंगारा देण्यात यशस्वी होत होता.
दि. 3 ऑक्टोबर 2024 रोजी बोपदेव घाट परिसरात रात्री मित्राबरोबर फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीला कोयत्याचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींच्या तपासासाठी बोपदेव घाटाच्या परिसरातील 45 गावे, वाड्या, वस्तींवरील 450 सराईतांची चौकशी केली होती.
आरोपींचा माग काढण्यासाठी गुन्हे शाखेकडून 60 पथके तयार करण्यात आली होती. त्यानंतर 10 ऑक्टोबर रोजी येवलेवाडी परिसरातून कनोजियाला अटक करण्यात आली होती. चौकशीत आरोपी अख्तर शेख उत्तर प्रदेशातील प्रयागराजजवळ असलेल्या मूळगावी पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने शेखला उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेत अटक केली होती.
या प्रकरणातील आरोपी सूरज गोसावी हा फरारी होता. शनिवारी (दि. 26) गोसावी हा अकलूज, ता. माळशिरस येथील जुन्या बसस्थानक परिसरातून पळून जाण्याच्या तयारीत असून, तो कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल बलात्काराच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी असल्याची माहिती वालचंदनगर पोलिसांना मिळाली.
त्यानुसार वालचंदनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे,पोलिस हवालदार गुलाबराव पाटील, शैलेश स्वामी, सचिन गायकवाड, अभिजित कळसकर, विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर यांनी केली.
वालचंदनगर पोलिसांनी आरोपीला पकडले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा ताबा घेतला असून, पुढील तपास सुरू आहे. यापूर्वी दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
- निखिल पिंगळे, पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा
खुनाच्या गुन्ह्याचा तपास करत असताना, गोसावी याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने त्याला अकलूज परिसरातून ताब्यात घेतले. त्याला पुढील कारवाईसाठी पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
- राजकुमार डुणगे, सहायक पोलिस निरीक्षक, वालचंदनगर पोलिस ठाणे.