

पुणे: राज्यासह देशाच्या बहुतांश भागात पुढील दोन आठवडे पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून, राज्यात पुढील चार ते पाच दिवस तुरळक पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, २७ ऑगस्टपर्यंत ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, उत्तर प्रदेश तसेच विदर्भाच्या तुरळक भाागात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे.
इतर भागात पाऊस कमी राहणार आहे. त्यानंतर २ सष्टेंबरपर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होणार असल्याने पूर्व, पूर्वोत्तर भारतासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहारमध्ये दमदार पावसाची शक्यता आहे.
या दोन्ही आठवड्यात पश्चिम भारत, वायव्य भारत, उत्तर आणि दक्षिणेच्या भागात कमी पाऊस बरसणार आहे. २ सप्टेंबरपर्यंत देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान, देशात १ जून ते १९ ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत १३ टक्के तुटीचा पाऊस झाला आहे. १३ तसेच १९ ऑगस्टच्या आठवड्यातही देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून पुढील दोन आठवड्यातील तुटीच्या पावसामुळे ऑगस्ट महिना पावसाच्या दृष्टीने तुटीचा ठरण्याची चिन्हे आहेत.