

Maharashtra rain crop damage
पुणे: राज्यात ऑगस्ट महिन्यात सर्वदूर होत असलेल्या जोरदार पावसामुळे खरीप हंगामातील सुमारे पाच लाख पन्नास हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातच सर्वाधिक म्हणजे दोन लाख 60 हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली असल्याची माहिती कृषी आयुक्तालयातून देण्यात आली.
पीक नुकसानीमध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, खरीप ज्वारी, बाजरी, हळद, मका याशिवाय कांदा, भाजीपाला आणि फळ पिकांचा समावेश असल्याचेही कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात नमूद केले आहे. या पावसामुळे खरिपातील पिकांचे नुकसान होत असले तरी भात पिकासाठी हा पाऊस पूरक ठरेल. तसेच ऊस पिकासही या पावसाचा फारसा फटका बसणार नसल्याचेही सांगण्यात आले. (Latest Pune News)
जिल्हानिहाय झालेले पिकांचे नुकसान पुढीलप्रमाणे बुलढाणा 10 हजार 702, अमरावती 12 हजार 361, यवतमाळ 80 हजार 969, अकोला 43 हजार 702, वर्धा 776, सोलापूर 41 हजार 772,अहिल्यानगर तीन हेक्टर, धुळे 23 , जळगाव 12 हजार 327, नांदेड 2 लाख 59 हजार 789, हिंगोली 40 हजार, परभणी 14 हजार, छत्रपती संभाजी नगर 2 हजार 74, जालना 2 हजार 146, बीड 930, धाराशिव 28 हजार 500, लातूर 10 हेक्टर.
ऑगस्ट महिन्यातील जोरदार पावसामुळे साडेपाच लाख हेक्टरवरील पिकांना फटका बसला असल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. हवामान खात्याने हा पाऊस तूर्त कायम राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. पावसाची अशीच स्थिती राहिल्यास खरीप पिके बाधित होण्याच्या नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याचा अंदाज आहे. पीक नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना क्षेत्रीय स्तरावर देण्यात आल्या आहेत.
- रफिक नाईकवाडी, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषी आयुक्तालय, पुणे