

पुणे : फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजी, ऑडिओलॉजी, प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स या विषयातील पदव्युत्तर पदवी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुकांना 16 ते 23 ऑक्टोबरदरम्यान अर्ज भरता येणार असल्याची माहिती राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटीसेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली आहे. या सर्व अभ्यासक्रमासाठी सीईटी कक्षाकडून ऑनलाइन आणि कॉमन प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. संबंधित परीक्षा रविवार, दि. 9 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रात ही परीक्षा होईल, असे सीईटी कक्षाने सांगितले. (Latest Pune News)
पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामान्य प्रवेश परीक्षेचे पात्रता निकष आणि प्रक्रिया असलेली माहिती पुस्तिका www. mahacet.org या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार परीक्षा केंद्राचे प्रवेशद्वार दि. 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता बंद केले जाईल. त्यानंतर प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवाराने प्रवेशपत्र आणि माहिती पुस्तिकेत नमूद सूचनांचे पालन करावे. तसेच उमेदवार महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयातून पदवी उत्तीर्ण असणे आणि 31 ऑक्टोबरपूर्वी अनिवार्य इंटर्नशिप पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
दि. 16 ते 23 ऑक्टोबर : ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज भरणे, शुल्क भरणादेखील ऑनलाइन करणे.
दि. 5 नोव्हेंबर : नोंदणीकृत उमेदवारांच्या लॉगिनद्वारे प्रवेशपत्र जारी करणे.
दि. 9 नोव्हेंबर : सकाळी 9 ते 10:30 पर्यंत परीक्षा केंद्रात प्रवेश आणि 11 ते दुपारी 12:30 ऑनलाइन परीक्षा