

पुणे: महाराष्ट्रात ऑक्टोबरची उष्णता यंदा चांगलीच जाणवत असून अनेक शहरांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा ३ ते ६ अंशांनी अधिक नोंदले आहे. हवामान विभागाच्या अहवालानुसार, ७ ऑक्टोबर रोजी अमरावतीमध्ये सर्वाधिक ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे ऑक्टोबरमध्येच एप्रील-मे महिन्यासारखा प्रचंड उकाडा जाणवत आहे.
हवामान विभागाच्या प्रादेशिक केंद्राच्या नोंदीनुसार, ७ ऑक्टोबर रोजी यवतमाळ ३८.२, अकोला ३७.९, जळगाव ३७.६, सोलापूर ३७.६, वर्धा ३७.६ आणि चंद्रपूर ३७.२, अहिल्यानगर ३६.३, छत्रपती संभाजीनगर ३६.५, कोल्हापूर ३३.६, नाशिक ३५.४, परभणी ३५.६, सांगली ३५, सातारा ३५.७, धाराशिव ३४.२, उदगीर ३४.६, मुंबई सांताक्रूझ ३५.४, रत्नागिरी ३७.५ अंश होते. महाबळेश्वरमध्ये २७.९ अंशांची नोंद झाली.
पाऊस होऊनही पुणे तापले...
पुण्यात यंदा मान्सून हंगामात ७१५ मि.मी. पाऊस झालेला असला तरीही उष्णतेचा विक्रमी तडाखा जाणवत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, पावसाचा अभाव, आकाश निरभ्र राहणे आणि वाढलेले सौर प्रारण ही यामागची प्रमुख आहेत.
दरम्यान, देशात ३ ऑक्टोबर रोजी राजस्थानातील जैसेलमेर ४१, तर ६ रोजी पिलानीमध्ये ३९.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
काय आहेत कारणे...
या उष्णतेला यंदाच्या अल-निनोचा मोठा हवामानशास्त्रीय संदर्भ आहे.
जागतिक पर्यावरण संघटनेच्या ८ ऑक्टोबरच्या ताज्या अहवालानुसार, मध्य व पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील तापमान वाढत आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये अल-निनोची तापमान विषमता ३.७ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. हा आतापर्यंतच्या नोंदीतील दुर्मिळ अल निनो ठरू शकतो.
त्यामुळे यंदाचा ऑक्टोबर एप्रिल-मेप्रमाणे दुपारच्या तीव्र उन्हाची जाणीव करून देत असला, तरी प्रत्येक दिवस विक्रमी असेल, असे नाही.
सध्याची परिस्थिती ही कमी पाऊस, निरभ्र आकाश, अधिक सौर प्रारण आणि दीर्घकाळ कोरडे हवामान यांच्या एकत्रित परिणामातून निर्माण झालेली आहे.