

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्यातील नायब तहसीलदार हे राजपत्रित व अत्यंत महत्त्वाचे पद असून महसूल विभागातील कामकाज यांच्यावर अवलंबून असते. परंतु, वाढीव वेतनासाठी नायब तहसीलदार हे बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 150 नायब तहसीलदार सहभागी झाले आहेत.
नायब तहसीलदार या पदाचे वेतन वर्ग-3 प्रमाणे दिले जाते. नायब तहसीलदार यांचे ग्रेड पे वाढविण्याबाबत 1998 पासून महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेकडून पाठपुरावा केला जात आहे. मात्र, त्यावर शासनस्तरावरून कोणताही निर्णय होत नाही. त्यामुळे सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
यापूर्वी शासनस्तरावर बैठक झाली होती. त्यामध्ये हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन शासनाकडून दिले गेले. मात्र, त्याची कोणतीही अंमलबजावणी न झाल्याने के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली वेतन त्रुटी समिती स्थापन केली होती. या समितीकडे ग्रेड पे 4 हजार 800 रुपये वाढविण्यासंदर्भात सादरीकरण करूनही तसेच कामाचे स्वरूप, जबाबदारी आदींची माहिती देऊनही संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार करणात आलेला नाही, असा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.