महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीयोजनांना गती द्या : आ. सुनील शेळके

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीयोजनांना गती द्या : आ. सुनील शेळके

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील डोंगरगाव-कुसगाव, डोणे-आढले, कार्ला, खडकाळा,पाटण या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत असणार्‍या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती द्यावी, अशा सूचना आमदार सुनील शेळके यांनी अधिकारी व ठेकेदार यांना बैठकीत दिल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत मावळ तालुक्यातील योजनांची कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.

या पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेळके यांनी कामांची सद्यस्थिती, समस्या जाणून घेण्यासाठी सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, संबंधित ठेकेदार व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत मंगळवारी वडगाव मावळ येथे संयुक्त आढावा बैठक घेतली. डोंगरगाव-कुसगाव योजनेसाठी 6 कोटी 10 लक्ष, डोणे-आढले 3 कोटी 25 लक्ष, कार्ला 7 कोटी, खडकाळा 10 कोटी 51 लक्ष, पाटण योजनेसाठी 19 कोटी रु.निधी उपलब्ध झाला आहे.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या योजनांची कामे संथगतीने सुरू आहेत. तसेच काही ठिकाणी या कामांमध्ये दिरंगाई होत असल्यामुळे प्रत्यक्षात अडचणी कोणत्या आहेत यावर बैठकीत चर्चा झाली. प्रादेशिक पाणी योजनांची कामे पूर्ण झाल्यास या भागातील प्रत्येक घरापर्यंत पाणी मिळणार असून, अनेक वर्षांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील ज्या समस्या असतील त्या लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांनी समन्वय साधून सोडविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन आमदार शेळके यांनी केले. या भागातील पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी प्रलंबित कामांना गती देऊन कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा, अशा सूचना अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news