

पुणे : राज्यातील पर्यटनस्थळावर स्थानिक युवक-युवतींना रोजगार मिळावा, यासाठी राज्य शासनाच्या वतीने ‘आदरातिथ्य व मार्गदर्शक प्रशिक्षण’ देण्यात येणार आहे. यासाठी ‘नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमानुसार वर्षभरात राज्याच्या विविध भागांतील सुमारे 7 हजार 500 युवक-युवतींना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. (Latest Pune News)
महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक वैविध्यपूर्ण व पर्यटनासाठी आकर्षक राज्य आहे. नैसर्गिक सौदर्य, ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक महत्त्व, विविध धार्मिक स्थळे यांनी समृद्ध आहे. त्यातच ‘युनेस्को’मार्फत राज्यातील अकरा किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केली आहेत. त्यामुळे राज्यातील पर्यटनाला पुढील काळात चांगलीच चालना मिळणार आहे.
ही बाब लक्षात घेऊन पर्यटनाच्या माधमातून रोजगार निर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्थेस बळकटी देणे, पर्यटन क्षेत्रात गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि राज्याला जागतिक स्तरावर एक नामांकित पर्यटन हब म्हणून नावारूपाला आणण्यासाठी शासन स्तरावर जोमाने प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शासनाने राज्यातील पर्यटनस्थळावर विशेषत: ‘युनेस्को’ने घोषित केलेल्या किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांना इतिहासाबद्दल खरी माहिती देण्यासाठी स्थानिक मार्गदर्शक तयार करण्यासाठी ‘नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे.
पहिल्या टप्प्यात साडेसात हजार युवक-युवतींना मिळणार प्रशिक्षण
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या नियमावलीनुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील सुमारे 7 हजार 500 संबधित भागातील युवक-युवतींना मार्गदर्शक आदरातिथ्य क्षेत्राशी निगडित असलेले प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवड झालेल्या युवक-युवतींना इंदोरमधील भारतीय पर्यटन आणि यात्रा प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्याने प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
याचबरोबर राज्यातील पर्यटन क्षेत्राची संबधित असलेल्या सोलापूर येथील संस्थेच्या माध्यमातून देखील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना प्रमाणपत्र तसेच ओळखपत्र देण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात काम कसे करावे, याबाबत संबधित प्रशिक्षणार्थी ज्या भागातील आहेत. तेथे त्यांच्याकडून काम करून घेण्याचा अनुभव देखील देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामुळे युवक-युवतींना त्याच्यांच स्थानिक पातळीवर असलेल्या पर्यटन स्थळावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.