

पुणे : आपण आता महायुतीत आहोत. या आधी महाविकास आघाडीत होतो. त्या वेळी स्थानिक निवडणुका स्वतंत्रपणे लढत होतो आणि गरज पडली तर एकत्रही येत होतो. आताही तशी वेळ येऊ शकते. सगळ्यांना आपला पक्ष व आपली संघटना वाढविण्याचा अधिकार आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज संस्थांमध्ये स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले. (Latest Pune News)
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, भूविकास बँकेचे माजी अध्यक्ष मुरलीधर निंबाळकर, स्वाती चिटणीस, मारुती किंडरे, रोहन सुरवसे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पक्षात प्रवेश केला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार शंकर मांडेकर, माजी आमदार रमेश थोरात, सुनील टिंगरे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, वैशाली नागवडे, प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘मागील चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. मात्र, आता कुठल्याही क्षणी या निवडणुका जाहीर होऊ शकतात. सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली पाहिजे, तरच कार्यकर्ते तयार होतात. सगळ्यांनी तिकिटाचा विचार करू नये. जिंकून येण्याची क्षमता पाहूनच तिकीट दिले जाणार आहे. वरवर काम करू नका. मी सकाळी सहा वाजल्यापासून काम करतो; माझ्यासारखे करू नका, पण किमान निम्मे तरी करा,’ असा सल्ला त्यांनी दिला.
‘निष्ठेला आणि ध्येयाला महत्त्व द्या. जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांच्या घरापर्यंत जा. मला आता राज्यभर जास्त वेळ द्यावा लागणार आहे, फिरावे लागणार आहे. त्यामुळे तुमच्यावर महत्त्वाची जबाबदारी असणार आहे; ती नीट पार पाडा,’ असेही ते म्हणाले.
’मागचा अजित पवार आणि आताचा अजित पवार यात खूप मोठा फरक आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माझ्याकडे यायला संकोच करू नका. जसजसं वय वाढतं तसं मॅच्युरिटी येते. आधी काही चूक झाली तर पांघरून घालायला शरद पवार असायचे. आता आपल्यालाच पांघरून घालायचं आहे,’ असे पवार म्हणाले.
अशोक पवारांना सांगून पाडलंय...
शिरूरमध्ये माझी भावकी मला सोडून गेली. अशोक पवार पालकमंत्रीपदाची स्वप्नं पाहत होते. त्यांना वाटत होतं की ’तुम्ही दादांसोबत गेला, आपण इथे राहून मंत्री-पालकमंत्री होऊ.’ त्याला मी सांगितलं होतं. ’तू मला सोडून गेला, आता तुला पाडणार आणि अशोक पवारला पाडून माऊली कटके यांना निवडून आणलं,” असे पवार यांनी सांगितले.