

पुणे: नागरिकांच्या ताटात जाणारे अन्न सुरक्षित आहे की आरोग्याला धोका निर्माण करणारे? असा गंभीर प्रश्न अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) राज्यव्यापी कारवाईने उपस्थित झाला आहे.
अवघ्या तीन दिवसांत खाद्यतेल, पनीर, खवा, मिठाई, फरसाण आणि इतर अन्नपदार्थांच्या साठ्यांवर छापे टाकत सुमारे एफडीएने सुमारे ३.११ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये ३२ हजार लिटरहून अधिक खाद्यतेल आणि ३७ हजार किलोहून अधिक इतर अन्नपदार्थांचा समावेश आहे.
मानवी सेवनासाठी असुरक्षित पनीरपासून ते अस्वच्छ स्थितीत साठवलेल्या तेलापर्यंतचे प्रकार समोर आल्याने अन्नाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अन्नातील भेसळ, संशयास्पद दर्जा, अस्वच्छ साठवणूक आणि लेबलिंगमधील गैरप्रकार, हे नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित प्रश्न आहेत. सणासुदीच्या काळात मिठाई, फरसाण आणि खाद्यतेलाची मागणी वाढत असताना अशा प्रकारांचे उघड होणे अधिक चिंताजनक आहे.
मात्र, जप्त झालेला प्रत्येक पदार्थ भेसळयुक्त असल्याचे सिद्ध झालेले नाही. काही साठे संशयित दर्जा, अस्वच्छ साठवणूक किंवा चुकीच्या लेबलिंगच्या कारणांवरून जप्त केले आहेत.
राज्यभरातील कारवायांत संशयास्पद साठे, चुकीचे लेबलिंग आणि अस्वच्छ साठवणुकीचे प्रकार समोर आले. मात्र, दोष निश्चित करण्यासाठी प्रयोगशाळा अहवाल आणि कायदेशीर कारवाई महत्त्वाची आहे. नियमित तपासणी आणि दोषींवरील कठोर कारवाईतूनच नागरिकांच्या ताटातील अन्न सुरक्षित असल्याची खात्री मिळू शकेल.
पुण्यात नऊ हजार किलो पनीर जप्त
पुण्यातील बावधन, कसबा पेठ आणि बिबवेवाडीत मानवी सेवनासाठी असुरक्षित नऊ हजार किलो पनीर आणि ४४० किलो खवा जप्त करण्यात आला. चांदणी चौकातील सूर्यम् एंटरप्रायझेसमधून ९,८८८ लिटर तेल, तर मार्केट यार्डातील ३-डी मसाले अँड ड्रायफ्रुट्समधून ७७.७५ किलो अन्नपदार्थ जप्त केले आहे.
ऑलिव्ह ऑईलच्या नावाखाली शेंगदाणा तेल
भिवंडीतील विराज एंटरप्रायझेसमध्ये ‘पोमेस ऑलिव्ह ऑईल’च्या नावाखाली शेंगदाणा तेल विकले जात असल्याचे आढळले. कोकण विभागात ११,७७९ लिटर तेल आणि २,८५० किलो चहा जप्त करण्यात आला. एक कोटी २७ लाख ३५ हजार ६१ रुपयांचा संशयित माल पकडला आहे.
परभणीत २२ हजार किलो फरसाण जप्त
परभणीतील मोती नमकीन प्रा. लि. येथून २२,५५० किलो शेव-फरसाण मिश्रण (किंमत ६३.१४ लाख रुपये) जप्त करण्यात आले. मयूर, अथर्व आणि वरद ऑईल एजन्सीजमधून एकूण ९,३१६ किलो खाद्यतेल जप्त झाले. छत्रपती संभाजीनगर विभागात विविध अन्नपदार्थांचा ३३,९४० किलो साठा जप्त केला असून, त्याची किंमत ८७.५२ लाख रुपयांची नोंद केली आहे.
खवा, मिठाई आणि बेकरी पदार्थांवर कारवाई
धाराशिवमधील भूममध्ये २४९ किलो खवा जप्त करण्यात आला. तुळजापूर परिसरातही खवा भट्ट्यांवर कारवाई झाली. वैजापूरमधून ३४३ किलो तूप, तर सिल्लोडच्या न्यू भारत बेकरीतून १,०१३ किलो बेकरी पदार्थ जप्त करण्यात आले.
नागपुरात अस्वच्छ तेल; चंद्रपुरात संशयित खवा
नागपूर विभागात १,०७८.४० लिटर खाद्यतेल आणि ४९ किलो खवा जप्त झाला. चंद्रभागा ट्रेडर्समधील तेलाची किंमत १.८१ लाख रुपये, तर वरोरामधील जयंत स्वीट मार्टमधील खव्याची किंमत १९,६०० रुपये आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पेडगावमध्ये ८७ किलो संशयित निकृष्ट भगर जप्त करण्यात आली.
मुंबईत रंगयुक्त पदार्थ; चार आस्थापनांवर कारवाई
कांदिवलीतील श्री सद्गुरू फुड्समधून रंगाचा संशय असलेले वेफर्स व फरसाण, तर श्री गणेश फरसाण अँड स्वीट मार्टमधून रंग आढळलेली जिलबी आणि हलवा जप्त करून नष्ट करण्यात आला. अन्नसुरक्षा नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी मुंबईतील चार खाद्य आस्थापनांना परवाना निलंबन किंवा व्यवसाय बंदची नोटीस दिल्याचे पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
विभागाकडून भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. अन्नपदार्थांच्या दर्जात गैरप्रकार आढळल्यास नागरिकांनी तक्रार नोंदवावी.
- तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न औषध प्रशासन विभाग