

पुणे: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 17 नंबर अर्ज भरून खासगीरीत्या परीक्षा देता येणार आहे. त्यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना 21 मेपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत पाचवी किंवा आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीसाठी खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी करता येणार असल्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी स्पष्ट केले आहे.
अनेक शाळाबाह्य विद्यार्थी पात्र असूनही मंडळाने दिलेल्या मुदतीत नोंदणी करून न शकल्याने संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून जून-जुलै 2025च्या परीक्षांसाठी खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी करण्याची संधी देण्यात आली होती.
त्यानुसार जून-जुलै 2026मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी शाळाबाह्य खासगी विद्यार्थ्यांसाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये राज्य मंडळाच्या अटी-शर्तींनुसार नावनोंदणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. दहावी-बारावीच्या जून-जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे.
नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या सध्याच्या पत्त्यातील जिल्हा, तालुका, निवडलेले माध्यम, शाखेनुसार शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांची यादी दिसेल. त्यातून एका शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाची निवड करावी लागेल.
संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाने परीक्षा अर्ज, प्रकल्पांतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अनुषंगिक मूल्यमान याबाबतची कार्यवाही करायची आहे. नोंदणी शुल्क ऑनलाइन भरल्यावर त्याबाबतची पावती विद्यार्थ्याच्या त्याच्या लॉगिनमध्ये उपलब्ध होणार आहे.
खासगी विद्यार्थ्यांची नोंदणी नियमित शुल्कानेच केली जाणार आहे. त्यामुळे विलंब, अतिविलंब शुल्काची सुविधा उपलब्ध असणार नाही, तसेच नोंदणीसाठी मुदतवाढ असणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.