

पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी तीनवर्षीय विधी अभ्यासक्रमास चांगला प्रतिसाद लाभला असून, राज्यात केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश झाले असून 19,895 जागांपैकी सर्व म्हणजेच 19,895 जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश विधी महाविद्यालयात झाले आहेत. म्हणजेच, कॅपअंतर्गत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत, तर एकूण प्रवेशातील केवळ 3.94 टक्के जागा रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Latest Pune News)
शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी विधी शाखेच्या प्रवेशाला 30 जूनला सुरुवात झाली होती व ही प्रवेश प्रक्रिया 11 ऑक्टोबरपर्यंत सुरू होती. ही प्रवेश प्रक्रिया तीन महिने सुरू होती. यात प्रवेशाच्या तीन फेऱ्या झाल्या असून, संस्थात्मक फेरीसह चार फेऱ्यांत हे प्रवेश झाले आहेत. महाराष्ट्रातील 218 विधी महाविद्यालयांत हे प्रवेश झाले आहेत. मागील तीन वर्षाची आकडेवारी पाहिली असता यावर्षी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश 100 टक्के तर कॅप, ईडब्ल्यूएस व संस्थात्मक फेरी या तिन्ही जागा मिळून एकत्रित टक्केवारी ही 96 टक्के असून, मागील तिन्हीही वर्षी प्रवेशाची टक्केवारी ही 96 टक्के अशी एकसमान राहिली आहे. यावर्षी कॅप, ईडब्ल्यूएस व संस्थात्मक फेरी मिळून 23 हजार 859 जागा होत्या, त्यामध्ये 22 हजार 917 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यामध्ये 14 हजार 846 मुले व 8 हजार 71 मुली आहेत.
यावर्षीच्या विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या आकडेवारीकडे पहिले असता ईडब्ल्यूएस या प्रवर्गामध्ये 51.25 % जागा रिक्त राहिल्या आहेत. एकूण 1 हजार 678 जागांपैकी 818 जागा भरल्या असून, 860 जागा रिक्त आहेत. तर विधी अभ्यासक्रमाच्या व्यवस्थापनाच्या जागेमध्ये मात्र 99.95 % जागांमध्ये प्रवेश झाले आहेत. एकूण 2205 जागा व्यवस्थापनासाठी होत्या, त्यापेकी 2204 जागेवर प्रवेश झाले असून, फक्त 1 जागा रिक्त आहे. त्यामुळे लॉ इन बीबीए अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा प्रचंड कल असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मागील काही वर्षांपासून विधी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय वाढत आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या 96 टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. यावर्षी प्रवेशाच्या चार फेऱ्या झाल्या व ही प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडली.
- दिलीप सरदेसाई, आयुक्त, राज्य सीईटी कक्ष