

कात्रज : महाराणी ताराराणी यांच्या 351 व्या जयंती वर्षानिमित्त सरहद पुणे येथे राज्यस्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. राज्यभरातील 35 शाळांमधून 50 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्तम प्रतिसाद दिला.
स्पर्धेतील विषय महाराणी ताराराणी यांच्या पराक्रम, नेतृत्व, दूरदृष्टी आणि स्वराज्य रक्षणातील योगदानावर आधारित होते. भाषेचे बंधन नसल्याने मराठी, हिंदी आणि इंग््राजी माध्यमांतील विद्यार्थ्यांनी प्रभावी मांडणी करीत स्पर्धेला खऱ्या अर्थाने राज्यस्तरीय स्वरूप प्राप्त करून दिले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नगरसेविका वर्षा तापकीर प्रमुख उपस्थित होत्या. तसेच, संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर,अनुज नहार, मुख्याध्यापिका सुजाता गोळे, गीता खोत, कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक मयूर मसूरकर, संस्थेचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. परीक्षक म्हणून इतिहास अभ्यासक, लेखक व कवी सचिन खोपडे, गोपाळ कांबळे आणि रश्मी वानखडे यांनी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाचे परीक्षण केले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणी, आत्मविश्वास आणि सादरीकरण कौशल्याचे कौतुक केले.
स्पर्धा दोन गटांत घेण्यात आली. इयत्ता 5 वी ते 7 वी गटात प्रथम क्रमांक गुंजन राऊत (ज्ञानेश प्राथमिक शाळा) हिने पटकाविला. द्वितीय क्रमांक ईश्वरी शिवतरे (महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था कन्याशाळा, वाई) हिला मिळाला, तर तृतीय क्रमांक श्रावणी तावरे (कान्होजी जेधे विद्यालय, कारी तालुका) हिने मिळविला. उत्तेजनार्थ पारितोषिक स्पर्श कालवणकर (ब्लॉसम पब्लिक स्कूल, नऱ्हे), अवनी उल्हाळकर (सरहद स्कूल, कात्रज) आणि श्लोक विश्वासराव (पीईएस मॉडेल इंग्लिश हायस्कूल, शिवाजी) यांना प्रदान करण्यात आले.
इयत्ता 8 वी ते 10 वी गटात प्रथम क्रमांक वक्रतुंड कारले (सरहद ग्लोबल स्कूल, गुजरवाडी) याने मिळविला. द्वितीय क्रमांक अनुष्का बाबर (सुंदराबाई मराठे विद्यालय) हिला, तर तृतीय क्रमांक अलफिया पठाण (सिग्नेट पब्लिक स्कूल, नऱ्हे) हिला प्राप्त झाला. उत्तेजनार्थ पारितोषिक अंकिता जाधव (चाटे पब्लिक स्कूल), सान्वी मुंदडा (पोदार इंटरनॅशनल स्कूल, आंबेगाव) आणि आराध्या गर्जे (सरहद पब्लिक स्कूल, धनकवडी) यांना देण्यात आले.
इतिहासातील पराक्रमी स्त्रीनेतृत्वाचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने आयोजित ही स्पर्धा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांच्या ओजस्वी व अभ्यासपूर्ण भाषणांमुळे उपस्थितांना प्रेरणादायी अनुभव मिळाला.