

Mahadev Jankar criticizes BJP
पुणे: राष्ट्रीय समाज पक्षाने भारतीय जनता पक्षाला सत्तेत आणण्यासाठी मदत केली. मात्र सत्तेवर आल्यानंतर त्याची जाणीव भाजपच्या नेत्यांनी ठेवली नाही. भाजपला सत्तेतून घालविण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शुक्रवारी कार्यकर्त्यांना दिल्या.
‘रासप’च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी (दि. 1) रोजी आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी जानकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्या वेळी ते बोलत होते. तसेच भाजपला सत्तेवरून खाली आणण्याचा निर्धारदेखील या वेळी त्यांनी बोलून दाखवला. (Latest Pune News)
जानकर म्हणाले, ‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष कोणाबरोबरही युती करणार नाही. प्रत्येक प्रभाग, गट, गण या ठिकाणी पक्षाचा उमेदवार उभा करायचा आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकार्यांनी केवळ समाजमाध्यमावर फोटो टाकण्यापुरते काम न करता आपला पक्ष आणि पक्षाचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कसे जातील, यासाठी प्रयत्न करावे.
आगामी महापालिका, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रत्येक बुथवर रासपचा एक कार्यकर्ता असला पाहिजे, असे नियोजन करा, अशी सूचना त्यांनी केली. पक्षाचा जो पदाधिकारी काम करणार नाही, त्याला पदमुक्त केले जाईल. पक्ष सोडून जाणार्यांचा विचार करू नका, जे भाजपमध्ये गेले त्यांची अवस्था आज काय झाली, हे तुम्ही पाहत आहात.
‘ऊठ म्हटले की ऊठ आणि बस म्हटले की बस’ असे त्यांचे झाले आहे. भाजपमध्ये अनेकजण प्रवेश करत असल्याने त्यांचे जुने कार्यकर्ते हे आपल्याकडे येऊ शकतात, याचा विचार करा. रासपचे चार राज्यांत स्थान आहे. मध्य प्रदेशमध्ये संघटन बांधणी सुरू असल्याचे जानकर यांनी सांगितले.