पुणे: रंगाने लाल चुटूक, काटेरी आणि चवीला गोड असणार्या ’लिची’ या फळाचा हंगाम सुरू झाला आहे. ग्राहकांकडून लिची या फळाला मोठी मागणी असल्याने भाव तेजीत आहेत. किरकोळ बाजारात लिचीच्या प्रतिकिलोस 250 ते 350 रूपये दर मिळत आहे.
गुलटेकडी मार्केटयार्ड फळबाजारात कोलकात्ता येथून लिचीची आवक होत आहे. 24 एप्रिलपासून लिचीच्या हंगामास सुरुवात झाली आहे. सुरूवातीला 100 ते 150 बॉक्स इतकी आवक होत होती. (Latest Pune News)
आता त्यात वाढ होऊ ती 1500 ते 1600 बॉक्सवर पोहचली आहे. घाऊक बाजारात दर्जानुसार 10 किलोच्या एका बॉक्सला 1600 ते 2400 रूपये भाव मिळत आहे. येत्या आठवडाभरात बिहार येथूनही लिचीची आवक सुरू होईल, अशी माहिती लिचीचे व्यापारी शैलेश परदेशी यांनी दिली.
जून अखेर ते जुलै महिन्याच्या पहिल्या आठव्यापर्यंत हा हंगाम सुरू असतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हंगाम वेळेत सुरू झाला आहे. सध्या चांगल्या दर्जाच्या लिचीची आवक सुरू असेही परदेशी यांनी नमूद केले.