

तळेगाव ढमढेरे: शिरूर तालुक्यात लम्पी स्किन या संसर्गजन्य आजाराचा जनावरांमध्ये वेगाने प्रादुर्भाव वाढत असून, शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. लसीकरण करूनही काही जनावरे बाधित होत असल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पशुधनाच्या संरक्षणासाठी अधिक दक्ष राहण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
चासकमान कालव्यामुळे तालुक्यात दुग्धव्यवसाय हा वाढीला लागला आहे. मात्र, सध्या दुधाचे दर घसरले असताना खाद्याचे वाढते दर आणि त्यातच पशुधनावर आजारांचे संकट यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. (Latest Pune News)
गेल्या काही दिवसांपासून लम्पी रोगाचा फैलाव वाढत असून, काही जनावरे मृत्युमुखीही पडली आहेत. त्यामुळे जनावरांच्या संगोपनात अडथळे निर्माण होत असून, पशुसंवर्धन विभागाकडून सतत जनजागृती केली जात आहे.
लम्पी हा संसर्गजन्य आजार असून उपचारानंतर बरा होतो. त्यामुळे घाबरून न जाता वेळीच योग्य उपचार करून पशुधनाचे संरक्षण करणे गरजेचे आहे, असे करंदी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाचे पशुधन विकास अधिकारी डॉ. अमोल येडे यांनी सांगितले.