

प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : लिपस्टिक ही महिलांच्या दैनंदिन सवयींचा भाग बनली आहे. मात्र, अलीकडील काही संशोधनांमधून निकृष्ट लिपस्टिकमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही घटकांमुळे आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य धोक्यांविषयी गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. लिपस्टिकमध्ये शिसे, कॅडमियम आणि क्रोमियम, यांसारखे जड धातू असतात. हे धातू त्वचेद्वारे शोषले जाऊ शकतात, चुकून गिळले जाऊ शकतात किंवा श्वासाद्वारे शरीरात जाऊ शकतात आणि फुप्फुसाच्या कर्करोगाची शक्यता बळावू शकते, असे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. (Latest Pune News)
विरार येथील विवा महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय 5 बँडच्या लिपस्टिकमध्ये लेड किंवा कॅडमियम आढळले नाही; परंतु कॉपर, निकेल, क्रोमियम, झिंकसारखे धातू आढळून आले, जे परवानगी मिळालेल्या मर्यादेपेक्षा कमी होते. ‘सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायर्नमेंट’ या स्वयंसेवी संस्थेने 30 लिपस्टिकचे सर्वेक्षण केले. त्यांना अनेक लिपस्टिकमध्ये क्रोमियम आणि निकेल आढळले. परंतु, लेड किंवा कॅडमियम आढळले नाही. कॅडमियम हा फुप्फुसाच्या कर्करोगासाठी महत्त्वाचा कारणीभूत घटक मानला जातो. प्राण्यांवर झालेल्या चाचण्यांमध्ये कॅडमियम कर्करोग निर्माण करू शकतो, असे सिद्ध झाले आहे.
मोरादाबाद येथे झालेल्या ‘क्वांटिटेटिव्ह एस्टिमेशन ऑफ लेड अँड कॅडमियम इन कॉसमॅस्युटिकल्स’ या संशोधनामध्ये याबाबतचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये निकृष्ट दर्जाच्या 96 टक्के लिपस्टिकमध्ये शिसे, 51 टक्के लिपस्टिकमध्ये कॅडमियम, 61 टक्के लिपस्टिकमध्ये थॅलियम आढळून आले.
फुप्फुसांच्या आरोग्यावर परिणाम
लिपस्टिकमधील घटक श्वासावाटे किंवा गिळल्याने फुप्फुसांवर वाईट परिणाम होऊ शकतो
कॅडमियम हे सर्वात धोकादायक आहे. यामुळे मूत्रपिंड निकामी होऊ शकतात तसेच फुप्फुसाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
जड धातूंमुळे खोकला, दम लागणे, घरघर यांसारख्या समस्या होऊ शकतात.
पेट्रोलियम-आधारित घटक त्वचेला व्यवस्थित श्वास घेऊ देत नाहीत, ज्यामुळे आरोग्यावर आणखी परिणाम होतो.
लिपस्टिकमधील धातूचे कण सूक्ष्म असले तरी, दीर्घकाळ सतत वापर केल्याने शरीरात या धातूंचा साठा होतो. ओठावरील त्वचा खूप पातळ आणि संवेदनशील असल्यामुळे हे धातू रक्तप्रवाहात सहज मिसळतात. अशा प्रकारे शरीरात विषारी घटकांचा साठा होऊन कर्करोगासारख्या आजारांचा धोका वाढतो.
डॉ. गीतांजली पाटील, कन्सल्टंट पल्मनॉलॉजिस्ट, रुबी हॉल क्लिनिक, वानवडी
जागतिक फुप्फुस दिन लिपस्टिक काही प्रमाणात अन्नासारखी गिळली जाते. जागतिक स्तरावर लिपस्टिकमध्ये विषारी भांडीधातू जसे की, लेड आणि कॅडमियम संदर्भातील आरोग्यविषयक चिंता उपस्थित झाल्या आहेत. लेड हा संभाव्य मानव कर्करोगजनक आणि न्यूरोटॉक्सिन आहे, तर कॅडमियमला ग््रुाप 1 मानव कर्करोगजनक म्हणून वर्गीकृत केले आहे. दीर्घकालीन संपर्कानंतर फुप्फुस, स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाशी संबंधित आहे. बहुतेक भारतीय लिपस्टिकमध्ये आढळलेले प्रमाण तत्काळ विषारी स्तरापेक्षा खूप कमी आहे.
डॉ. किरण तामखाने, कॅन्सर फिजिशियन
लिपस्टिक कशी निवडावी?
नैसर्गिक घटकांचा पर्याय निवडा : मध, नारळतेल, वनस्पतीजन्य रंगद्रव्ये यांसारखे नैसर्गिक घटक असलेल्या लिपस्टिक निवडा.
प्रमाणित आणि नॉन-टॉक्सिक बँड्सचा वापर करा : ऑरगॅनिक आणि विषारी रसायनांपासून मुक्त, प्रमाणित बँड्स वापरणे अधिक सुरक्षित ठरते.
घरगुती लिपस्टिक तयार करा : मध, नारळ तेल, बीटरूट पावडर यांसारख्या नैसर्गिक घटकांपासून स्वतः लिपस्टिक तयार करा.
सजगतेने निवड करा : सौंदर्यप्रसाधनांची निवड करताना सजग राहा आणि आपल्या त्वचेच्या व आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित पर्याय निवडा.