

पुणे : भाविकांची दर्शनासाठी झालेली गर्दी, विद्युत रोषणाईने उजळलेले मंदिर, धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आणि आरोग्य शिबिराला मिळणारा पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, असे वातावरण सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात पाहायला मिळत आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिराच्या वतीने वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले असून, मंदिरात करण्यात आलेली सजावटही लक्ष वेधून घेत आहे.(Latest Pune News)
बुधवारी (दि. 24) महिला-युवतींची खास करून मंदिरात दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली आणि निळ्या रंगाचा पेहराव महिला-युवतींनी केला होता. कार्यक्रमांच्या जोडीला मंदिरातर्फे आरोग्य शिबिरही होत आहे. अस्थिरोग तपासणीपासून ते दंत तपासणीपर्यंत अशा विविध तपासण्या करण्यात येत आहेत.
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महालक्ष्मी मंदिरात उत्साहात आणि आनंदात नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भजन-कीर्तनापासून ते भक्तिगीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमांना भाविकांची उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर सामाजिक उपक्रमही राबविले जात असून, त्यात प्रामुख्याने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
महालक्ष्मी मंदिर आणि ‘एमटीईएस’च्या संजीवन हॉस्पिटलच्या वतीने हे शिबिर होत असून, सोमवारी (दि. 22) नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी शिबिराला सुरुवात झाली. या शिबिरात विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात येत आहेत. त्यात जनरल मेडिसीन, स्त्रीरोग, दंतरोग, अस्थिरोग, शल्यचिकित्सा अशा तपासण्यांचा समावेश आहे. सुमारे 200 हून अधिक जणांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आहे. या शिबिराला येणाऱ्यांना विविध सवलतीही देण्यात येत आहेत. हे शिबिर महालक्ष्मी मंदिराजवळ गुरुवारपर्यंत (दि. 2 ऑक्टोबर) सायंकाळी चार ते रात्री नऊ या वेळेत आयोजित केले असून, हे आरोग्य शिबिर विनामूल्य असणार आहे.