

ज्ञानेश्वर बिजले
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात महिला लोकप्रतिनिधींचे प्रमाण आठ-दहा टक्के असले, तरी पुणे जिल्ह्यात त्यांची संख्या 18 ते 20 टक्के आहे. पुणे जिल्ह्यात दोन महिला खासदार, चार महिला आमदार आहेत. त्या राज्यात तसेच केंद्रातही त्यांच्या पक्षाचे नेतृत्व हिरिरीने करीत आहेत. संसदीय आणि विधिमंडळाच्या कामकाजातही त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे.
पुण्यातील महिला लोकप्रतिनिधी विधिमंडळात आणि संसदेत अगदी सुरुवातीपासूनच कार्यरत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना प्रथम 33 टक्के आणि त्यानंतर 50 टक्के आरक्षण मिळाल्यानंतर त्यांच्यातून काही जणींचे नेतृत्व पुढे आले. पुण्यातील सहा महिला लोकप्रतिनिधींपैकी चौघी जणी महापालिकेत नगरसेविका होत्या. विद्यमान खासदार आणि आमदार यांच्या कारकिर्दीकडे लक्ष दिल्यास त्यांनी मिळविलेले यश लक्षणीय असल्याचे दिसून येते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे लोकसभेत पक्षाच्या गटनेत्या आहेत. लोकसभेच्या कामकाजात त्यांचा चांगला सहभाग आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्याच खासदार वंदना चव्हाण 2012 पासून राज्यसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत. राज्यसभेच्या सभापतिपदाच्या तालिकेवर त्या आहेत. पुण्याचे महापौरपद त्यांनी भूषविले तसेच काही काळ त्या आमदारही होत्या. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत्या डॉ. नीलम गोर्हे विधानपरिषदेच्या उपसभापती असून, गेल्या जुलैपासून सभापतिपदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
सामाजिक चळवळीत कार्य केल्यानंतर त्यांनी 1998 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. 2002 पासून सलग चारवेळा त्या शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून गेल्या. भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांचे नावही आता पुण्यातून लोकसभा उमेदवार म्हणून चर्चेत आले आहे. त्या पुणे महापालिकेत नगरसेविका होत्या. त्या 2009 पासून पर्वती मतदारसंघातून आमदार म्हणून तीनवेळा निवडून आल्या आहेत.
पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आल्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती तुटली. तेव्हा ऐनवेळी नगरसेविका असलेल्या प्रा. मेधा कुलकर्णी यांना 2014 मध्ये कोथरूड मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळाली. त्या निवडून आल्या होत्या. भाजपतर्फे 2002 पासून नगरसेविका असलेल्या मुक्ता टिळक यांना भाजपची महापालिकेत सत्ता आल्यानंतर महापौरपदाचा मान मिळाला. त्या पदाचा कार्यकाळ संपताच त्यांना पक्षाने कसबा पेठ मतदारसंघातून उमेदवारी दिली.
त्या आमदार असताना नुकतेच त्यांचे निधन झाले. तेथील पोटनिवडणुकीत गेल्या आठवड्यात काँग्रेसने बाजी मारली. मात्र, त्याचवेळी चिंचवडमधील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप निवडून आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या माजी प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर ह्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत.
राज्यातील महिला लोकप्रतिनिधी
विधानसभेतील 288 आमदारांमध्ये 25 महिला आमदार आहेत. त्यांच्यामध्ये भाजपच्या 12, काँग्रेसच्या 6, राष्ट्रवादीच्या 3, शिवसेनेच्या 2 आणि अपक्ष दोघी जणी आहेत. विधानपरिषदेत शिवसेनेच्या 2, तर काँग्रेस आणि भाजपची प्रत्येकी एक महिला आमदार आहे. लोकसभेवर महाराष्ट्रातून आठ महिला खासदार निवडून गेल्या. त्यांच्यापैकी पाच जणी भाजपच्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि अपक्ष प्रत्येकी एक खासदार आहे. राज्यसभेवर महाराष्ट्रातून चार खासदार निवडून गेल्या. त्यांच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन, तर काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एकीचा समावेश आहे.