

भिगवण; पुढारी वृत्तसेवा : भिगवण येथून हरवलेले आणि चोरीस गेलेल्या मोबाईलचा तांत्रिक विश्लेषणाने छडा लावत भिगवण पोलिसांनी राज्याच्या कानाकोपऱ्यातुन व परराज्यातून तब्बल ५ लाख ३० हजार रुपये किमतीचे ३२ मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांना साेमवारी (दि. २७) परत केले. मोबाईल चोरट्यांनी गेल्या काही वर्षांपासून भिगवणला टार्गेट केले होते. आठवडी बाजार, गर्दीच्या ठिकाणी हे चोरटे हातोहात महागडे मोबाईल लंपास करीत असत. यामुळे अनेकजण हवालदिल झाले होते. अगदी दहा हजारांपासून एक लाखापर्यंतचा मोबाईल चोरीच्या घटना घडल्या होत्या.
ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी याबाबत केलेल्या सूचनांची दखल घेत भिगवण पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व सायबर सेलचा आधार घेत राज्य व राज्याबाहेर चोरीस गेलेल्या मोबाईलचा तपास लावला. चोरलेले मोबाईल हे गोवा, कर्नाटक, गुजरात तसेच महाराष्ट्रातील यवतमाळ, कोल्हापूर, सातारा, बीड, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद अशा जिल्ह्यातून जप्त करून ते मूळ मालकांना स्वाधीन केल्याने त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता.
याच कारवाईत ८० हजार रुपये किमतीची दुचाकी देखील ताब्यात घेण्यात आली असून एकूण ६ लाख १० हजार रुपये किंमतीचा माल जप्त करून नागरिकांच्या स्वाधीन केल्याची माहिती दिलीप पवार यांनी दिली. ही कामगिरी पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, विभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांचेसह गुन्हा शोध पथकातील पोलिस उपनिरीक्षक रुपेश कदम, तसेच महेश उगले, हासिम मुलाणी, अंकुश माने यांनी केली.