पुणे: पूर्वमोसमी पावसाने पुणेकरांची त्रेधातिरपीट उडवली असतानाही महापालिका अजूनही नालेसफाईच्या कामात अपुरीच आहे. आंबिल ओढा, नागझरी नाला, भैरोबा नाला आणि अन्य ठिकाणी नालेसफाईची कामे सुरू असून, अधिकार्यांनी 70 टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला आहे.
मात्र, प्रत्यक्षात नाल्यातील गाळ आणि कचरा बाजूला काढण्याऐवजी तसाच नाल्यातच ठेवण्यात येत आहे. तर, काही ठिकाणी कचरा फक्त एका बाजूला पसरवून नालेसफाईचा फार्स केला जात आहे. (Latest Pune News)
यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी तोच गाळ पुन्हा नाल्यात साचत असून मोठा पाऊस झाल्यास ओढ्याला पूर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेच्या नियोजनानुसार, एप्रिल महिन्यात सुरू झालेली नालेसफाईची कामे ही 7 जूनपूर्वी पूर्ण करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट होते.
शहरातील पूरग्रस्त ठिकाणी प्राधान्याने नाले सफाई करण्याचे आदेश पालिकेने दिले होते. यासाठी निविदादेखील काढण्यात आल्या होत्या. मात्र, या निविदा अपेक्षित खर्चापेक्षा 30 ते 52 टक्क्यांनी कमी दराने प्राप्त झाल्या. त्यामुळे नालेसफाई निकृष्ट दर्जाची होणार याची ओरड सुरू होती. पुणेकरांची ही शंका खरी निघाली, असून ठेकेदारांमर्फत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे सिद्ध झाले आहे.
जेसीबीच्या साह्याने नाल्यातील माती बाहेर उपसण्याऐवजी ती नाल्यातच पसरवली जात आहे. या बाबतचे अनेक व्हिडिओदेखील सोशल मिडियावर व्हायरल झाले असून, महापलिकेच्या प्रशासनाच्या वतीने मात्र, काम गुणवत्तापूर्ण होत असल्याचा दावा करत ठेकेदाराच्या बाजूने सारवासारव केली जात आहे.
आंबिल ओढ्यात भराव टाकून सफाईचा फार्स
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नालेसफाईच्या कामाची स्थिती उघड केली आहे. आंबिल ओढ्यातील दांडेकर पूल, दत्तवाडी परिसरात नाल्याच्या आतच जेसीबीच्या साह्याने काढण्यात आलेला राडारोडा नाल्यातच पसरवून टाकला जात आहे.
हा राडारोडा बाहेर काढून तो दुसर्या जागेत टाकणे अपेक्षित असताना ठेकेदार मात्र गाळ तसाच ठेवत आहे. या मुळे जोरदार पावसात वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याचा धोका वाढला आहे. या बाबत अधिकार्यांना विचारले असताही गंभीर बाब असून ‘ठेकेदाराला राडारोडा हटवण्यास सांगितले जाईल‘ असे उत्तर देण्यात आले.
पुणेकरांचा जीव धोक्यात
महानगर पालिकेतर्फे शहरातील 875 किलोमीटर लांबीचे नाले सफाई करण्यासाठी टेंडर काढण्यात आले होते. या साठी 23 टेंडर मंजूर करण्यात आले होते. हे टेंडर तब्बल 40 ते 53 टक्के कमी दराने देण्यात आले होते. या साठी 14 कोटी 50 लाख खर्च अपेक्षित होता. मात्र, नालेसफाईची कामे निकृष्ट पद्धतीने करून पुणेकरांचा जीव धोक्यात घातला जात आहे.
नीलायम थिएटरच्या मागे असलेल्या आंबिल ओढ्यातील परिस्थिती अधिकच चिंताजनक आहे. या ठिकाणी ठेकेदारामार्फत राडारोडा तसाच नाल्यात टाकून ओढ्याचा प्रवाह अडवला जात आहे. मलनिःसारण विभागाचे अधिकारी व अभियंते कागदोपत्री काम पूर्ण झाल्याचा दावा करत असून प्रत्यक्षात साफ सफाईच्या नावाखाली फक्त दिखावा सुरू आहे.
-शंकर मांडेकर, स्थानिक नागरिक
पावसाळा सुरू व्हायच्या आधीच पुणेकरांना या बेपर्वाईचा फटका बसू लागला आहे. नालेसफाईच्या नावाखाली होत असलेल्या हलगर्जीपणामुळे शहरात संभाव्य पूरस्थितीचा धोका वाढला आहे. ठेकेदारांचा नफा आणि अधिकार्यांची उदासीनता यामध्ये सामान्य पुणेकर भरडला जात आहे. या बोगस काम करणार्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी.
- श्रीकांत देशपांडे, नागरिक