

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: घराला कुलूप लावून लोणावळा येथे फिरायला जाणे दाम्पत्याला महागात पडले आहे. चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील रोख रक्कम व दागिने असा एकूण 95 हजार 50 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शिवशंभो कॉलनी, आदर्शनगर, किवळे येथे शुक्रवारी (दि. 9) दुपारी तीन ते शनिवारी (दि. 10) रात्री दहा या कालावधीत घडली.
अबीदअली इलाही अलीसाहब मुलतानी (32, रा. शिवशंभो कॉलनी, आदर्शनगर, किवळे) यांनी रविवारी (दि. 11) देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची पत्नी घराला कुलूप लावून लोणावळा येथे गेले होते.
दरम्यान, अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातून 80 हजार 50 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने, तसेच 15 हजारांची रोकड, असा एकूण 95 हजार 50 रुपयांचा ऐवज चोरून नेला.
अधिक तपास देहूरोड पोलिस करीत आहेत.