

वडगाव मावळ : गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या दुपारच्या वेळेतील लोणावळा-पुणे लोकलच्या फेर्या पुन्हा सुरू करण्यास रेल्वे विभागाने सकारात्मक भूमिका घेतली असून, लोणावळा ते पुणेदरम्यान आता दुपारच्या वेळेतही लोकल धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारपासून (दि. 15) दुपारच्या वेळेत सोईनुसार लोकल सुरू करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे, अशी माहिती बोर्डाने खासदार श्रीरंग बारणे यांना दिली.
दुपारची लोकल सुरू होणार असल्याने मावळ तालुक्यातील विशेषत लोणावळा शहरातील प्रवासी, विद्यार्थी, चाकरमानी, नोकरदार, पर्यटक यांची मोठी सोय होणार आहे. कोरोना साथ सुरू होण्यापूर्वी पुणे-लोणावळा दरम्यान लोकल गाड्यांचे संचालन व्यवस्थित सुरू होते. कोरोना साथीच्या कालावधीत रेल्वेची सेवाच बंद करण्यात आली. कोरोनानंतर आता देशात पूर्वीप्रमाणे सर्व रेल्वे सुरू झाल्या आहेत. कोरोना साथीच्या अगोदर पुणे-लोणावळादरम्यान सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच वाजताच्या कालावधीत दोन लोकल गाड्या चालवल्या जात होत्या, त्या गाड्यांचे संचालन बंद होते. सकाळी साडेदहा ते दुपारी अडीच या वेळेत लोकलसेवा बंद होती.
लोणावळा-पुणे व पुणे-लोणावळा या मार्गाने प्रवास करण्यासाठी जवळपास तीन ते चार तास लोकल नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. प्रामुख्याने शालेय विद्यार्थी, दुपारच्या पाळीला पिंपरी चिंचवड भागात कामाला जाणारे कामगार यांची मोठी गैरसोय झाली होती. त्यामुळे दुपारच्या लोकल पुन्हा सुरू करण्याची सातत्याने मागणी होत होती. नागरिकांमध्ये याबाबत आंदोलनाची भावना वाढत आहे. यासंदर्भात खासदार बारणे यांनी संसदेतही आवाज उठवला होता. तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर खासदार बारणे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
सातत्याने मागणी होऊनही रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संतप्त भावना निर्माण झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर 12 जानेवारी रोजी लोणावळा येथे जनआंदोलन करण्यात येणार असून, लोकल सुरू न केल्यास आपणही या जनआंदोलनात सहभाग घेणार असल्याचा इशारा खासदार बारणे यांनी दिला होता.
लोणावळा ते पुणेदरम्यान सोमवारपासून लोकल सुरू करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. त्यामुळे प्रवासी, विद्यार्थी, चाकरमानी, नोकरदार, पर्यटक यांची मोठी सोय होणार आहे.
– श्रीरंग बारणे, खासदार
हेही वाचा