

लोणावळा : लोणावळा नगर परिषद सेवकवर्ग सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत चुरस निर्माण झाली असून, ऐन सणासुदीच्या काळात वातावरण चांगलेच तापले आहे. एकता सेवक विकास पॅनेलविरुद्ध कामगार एकता सहकारी पॅनल यांच्यादरम्यान ही लढत होत आहे. लढतीपूर्वीच एकता सेवक विकास पॅनेलचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. त्यामुळे 15 पैकी उर्वरित 11 जागांसाठी 19 उमेदवार रिंगणात आहेत.
1 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 11 जागांसाठी एकता सेवक विकास पॅनेलचे 11 उमेदवार कप-बशी चिन्हावर रिंगणात आहेत. तर, कामगार एकता सहकारी पॅनलचे 7 उमेदवार ढाल-तलवार हे चिन्ह घेऊन लढत देत आहेत. एकता सेवक विकास पॅनेलचे जितेंद्र राऊत हे इतर मागास संवर्गातून, संतोष गिरी हे भटक्या विमुक्त जाती-जमाती संवर्गातून तर स्वाती गायकवाड, जयश्री रानवे या महिला गटातून बिनविरोध निवडून आल्या आहेत.
कामगार एकता सहकारी पॅनलने 11 जागांसाठी केवळ 7 जणांनाच उमेदवारी दिल्याने उर्वरित 4 जागांवर एकता सेवक विकास पॅनेलचे उमेदवार निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच 15 पैकी 8 जागा आपण जिंकल्या असून पतसंस्थेवर एकता सेवक विकास पॅनेलचे सत्ता बहुमताने बसत असल्याचा दावा या पॅनेलच्या उमेदवारांकडून करण्यात येत आहे.
सर्वसाधारण गटात एकता सेवक विकास पॅनेलचे अनिल अकोलकर, सुभाष बलकवडे, प्रकाश भोरडे, खंडू बोभाटे, संजय गुजर, प्रमोद हगवणे, सूर्यकांत हाळूदे, बबन कांबळे, मुरलीधर कांबळे, राजेश सपकाळ तर कामगार एकता सहकारी पॅनलचे सुनील दहिभाते, श्रीकांत कंधारे, अंकुश खिल्लारे, अरुण मातेरे, अनंता टेमघरे, राजू वाघमारे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. अनुसूचित जाती-जमाती जागेसाठी एकता सेवक विकास पॅनलचे चेतन सरवान, कामगार एकता सहकारी पॅनलचे अरविंद सोनवणे, अपक्ष उमेदवार नरेश साळवे यांच्यात तिरंगी लढत होत आहे.
साधारणतः 64 वर्षांपूर्वी लोणावळा नगर परिषद सेवकवर्ग सहकारी पतसंस्थेची स्थापना 1959 मध्ये झाली. या संस्थेचे भागभांडवल 6 कोटी रुपयांच्या घरात आहे. संस्थेचे 258 एकूण सभासद असून 230 सभासद निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. लोणावळा नगर परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय शाळा क्र. 1 येथे सकाळी साडेसात ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार आहे. यापूर्वी, 2007 व 2015 ला पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाली होती.