Loksabha election | बारामती कुणाची? बारामतीच्या निकालाची देशाला उत्सुकता!

Loksabha election | बारामती कुणाची? बारामतीच्या निकालाची देशाला उत्सुकता!
Published on
Updated on

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाची गेल्या तब्बल 67 वर्षांमधील मतदानाची टक्केवारी काही अपवाद वगळता सुमारे 50 ते 55 टक्क्यांची राहिली आहे. परिवर्तनाला आवश्यक असणारी भरघोस टक्केवारी आणि उत्साह यांचा अभाव असल्याने यंदा ही टक्केवारी फारशी वाढणार नाही, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे नेमका निकाल काय लागणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

बारामतीमध्ये अपवादानेच मतदानाच्या टक्केवारीने 60 टक्क्यांचा आकडा ओलांडला असून, त्यातील प्रत्येक वेळी त्यामागे काहीतरी कारण असल्याचे दिसून येते. बारामतीतील आत्तापर्यंतचा उच्चांक 1984 मधील असून, तो 70.75 टक्क्यांचा होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत मतदार मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले होते. देशात काँग्रसने प्रचंड बहुमत मिळवले आणि विरोधी पक्ष पालापाचोळ्यासारखा वाहून गेला होता. त्या स्थितीचे वर्णन भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी 'लोकसभा नव्हे शोकसभा' असे केले होते.

या स्थितीत बारामतीमध्ये विक्रमी सत्तर टक्क्यांचे मतदान झाले, मात्र मोठे मतदान होऊनही काँग्रेसला रोखण्यात समाजवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यशस्वी झाले होते. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवरील 1977 ची निवडणूक ही काँग्रेसला दणका देणारी होती. त्या निवडणुकीत मात्र बारामतीने काँग्रेसविरुद्ध कौल दिला होता आणि लोकदलातर्फे संभाजीराव काकडे विजयी झाले होते. त्या निवडणुकीत 61.52 टक्के मतदान झाले होते. त्याचप्रमाणे 1999 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची  स्थापना केल्यानंतर बारामतीमधील त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करवून घेतले होते. त्यामुळे 63.92 टक्के मतदान झाले.

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर जशी काँग्रेसची लाट आली, तशीच 2014 मध्ये भाजपच्या नरेंद्र मोदी यांची लाट आली. त्या लाटेतही बारामतीचा गड पवार यांनी राखला होता. बारामतीत 2014 मध्ये 58.83 टक्के, तर 2019 मध्ये 61.7 टक्के मतदान झाले होते. मोदी लाटेमुळे मतदानात थोडी वाढ झाली आणि एका निवडणुकीत त्या टक्केवारीने साठचा आकडा ओलांडलाही, पण तरीही मोदींना बारामती जिंकता आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे या 2009 प्रमाणेच 2014 आणि 2019 मधील निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी नेहमीच्या सरासरीऐवढी होईल, असा प्राथमिक अंदाज आहे.

अंतिम आकडेवारी आल्यावरच खरे चित्र स्पष्ट होईल. मतदानाची टक्केवारी कमी असल्याने कोणतीही लाट नसल्याचे स्पष्ट होत आहे. भारतीय जनता पक्षाबरोबर असणारे अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांच्या पक्षाने प्रयत्न करूनही मतदानाची टक्केवारी नेहमीपेक्षा वाढू शकलेली नाही. त्यामुळे याचा परिणाम नेमका काय होईल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

तब्बल 9 वेळा पवार कुटुंबाकडेच बारामती

बारामती मतदारसंघाची निर्मिती 1957 मध्ये झाल्यानंतर आत्तापर्यंत झालेल्या 16 निवडणुकांपैकी 9 वेळा काँग्रेसने, 5 वेळा राष्ट्रवादी काँग्रेसने, एकदा शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसने, तर एकदाच लोकदलाने बाजी मारली आहे. त्यातही तब्बल 9 वेळा पवार कुटुंबाकडेच बारामती राहिली आहे. शरद पवार 1984, 1996, 1998, 1999, 2004 अशा पाच वेळा बारामतीतून लोकसभेवर गेले असून, त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी 2009, 2014 आणि 2019 अशा तीन वेळा बारामतीतून दिल्ली गाठली आहे. एकदा म्हणजे 1991 मध्ये अजित पवार काँग्रेसतर्फे विजयी झाले होते. याचाच अर्थ काँग्रेसच्या विचाराची घट्ट पकड या मतदारसंघावर असून, त्यातही शरद पवार यांना मानणार्‍या मतदारांचे बहुमत दिसून येते.

ताकद विभागली, मतदानातही घट

आता पवार यांच्याच घरात फाटाफूट झाली आहे. 16 पैकी नऊ निवडणुकांत पवार विरुद्ध भाजप, पवार विरुद्ध काँग्रेस अशा लढती झाल्या असून, त्यातील प्रत्येक वेळी पवार विजयी झाले आहेत. आता पवार यांच्याच घरात फूट पडल्याने पवार कुटुंबाची ताकद शरद पवार आणि अजित पवार अशी विभागली गेली आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांकडून अधिकाधिक मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत खेचून आणले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती, मात्र मतदानाची टक्केवारी नवा विक्रम गाठू शकली नसल्याने बारामतीच्या निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news