

बारामती : मागील लोकसभेच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा बारामतीत मतदानाचा टक्के घसरला. त्याला अनेक कारणे असल्याचे खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले त्या म्हणाल्या की, सत्ताधार्यांचे गलिच्छ राजकारण त्यासाठी कारणीभूत आहे. बारामतीत पैसे वाटपाचे प्रकार कधी घडले नव्हते. सशक्त लोकशाहीसाठी असे प्रकार घातक आहेत. बारामतीत घडलेला हा प्रकार खूपच दुर्दैवी, वेदना व दुःख देणारा आहे. बारामती मतदारसंघाची संपूर्ण देशात शान आहे, असे प्रकार होणे म्हणजे मतदारसंघाला दृष्ट लागण्यासारखे आहे. मतदानानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात काही ठिकाणी गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला. यावर बोलताना सुळे म्हणाल्या की, कार्यकर्त्यांचे प्रेम आणि उत्साह यातून ते घडले.
देशासह राज्यात सत्ताधार्यांकडून गलिच्छ राजकारण सुरू आहे. सत्ताधार्यांकडून सर्व यंत्रणांचा गैरवापर केल्याचे निवडणुकीत
दिसून आले. विरोधकांनी पैसे वाटप केले, जिल्हा बँक रात्रीची सुरू ठेवली गेली. त्याचे व्हिडीओ, तक्रारी आम्ही दिल्या आहेत. या सगळ्यांबाबत निवडणूक आयोगाने प्रांजळपणे न्याय द्यावा, अशी अपेक्षा खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याचे विधान ज्येष्ठ नेते शरद पवारांनी केले होते. याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाले की, याबाबत तेच सविस्तरपणे सांगू शकतील. सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे. दोन-तीन महिन्यांनंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील. फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह गांधी, नेहरू यांच्या विचारांचे पक्ष इंडिया आघाडीमध्ये सामील आहेत. हे सर्वजण देशाचे संविधान वाचविण्यासाठी तसेच या देशात जी दडपशाही होत आहे ती मोडून काढण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
हेही वाचा