टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी-कवठे येमाई जिल्हा परिषद गटातील काही राजकीय समीकरणे अवलंबून आहेत. आगामी काळात होणार्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी कुणाची वर्णी लागणार याविषयी गावागावांत चर्चा रंगू लागल्या आहेत. टाकळी हाजी-कवठे येमाई जिल्हा परिषद गटात नेहमीच राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाल्याने प्रस्थापितांसह वरिष्ठांकडून डावलल्या गेलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी या लोकसभा निवडणुकीत उभारी घेतल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी पक्षात यापूर्वी संधी मिळत नव्हती ते शरदचंद्र पवार पक्षासोबत गेल्याने तिथे वेगवेगळ्या पदांवर त्यांची वर्णी लागल्याचे दिसून येत आहे.
या भागातील ज्येष्ठ नेते माजी आमदार पोपटराव गावडे यांनी निवडणूक जाहीर झाल्यापासून विकासाच्या आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या भागाचा केलेला कायापालट या मुद्द्यांवर राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी कंबर कसली. राष्ट्रवादी पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, शिवसेना शिंदे गटाचे डॉ. सुभाष पोकळे, भाजपाचे सावित्राशेठ थोरात यांनी महायुतीचा धर्म पाळत गटबंधन केले. टाकळी हाजीचे माजी सरपंच दामूशेठ घोडे, पंचायत समितीच्या माजी सदस्या अरुणा घोडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी सेलचे अध्यक्ष नाना फुलसुंदर, बन्सीशेठ घोडे, कवठे येमाईचे माजी सरपंच बबनराव पोकळे, प्रभाकर गावडे, अविनाश पोकळे, शिवसेना (उबाठा) चे गणेश जामदार यांनी एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासाठी जीवाचे रान केले आहे. सत्ताधार्यांच्या महायुतीबरोबर अनेक गावचे सरपंच, चेअरमन तसेच इतर नेत्यांचा मोठा फौजफाटा तर महाविकास आघाडीकडे निवडक कार्यकर्ते असा अनुभव आला. मात्र दोन्हीही बाजूने जोरदार शक्तिप्रदर्शन पहावयास मिळाले.
लोकसभेला या जिल्हा परिषद गटात महायुती की महाविकास आघाडी, कोण पुढे राहणार यावरून जिल्हा परिषद निवडणुकीत कोण बाजी मारणार हे ठरू शकते. त्यामुळे गटातील मताधिक्य ज्या बाजूने राहील त्यास पुढील निवडणूक सोपी जाणार असा संकेत असल्याने ही पुढील निवडणुकीची नांदी असल्याचे बोलले जात आहे. महायुतीतील राजेंद्र गावडे, सुभाष पोकळे, सावित्रा थोरात तर महविकास आघाडीतील दामूशेठ घोडे यांच्या नावाची दोन वर्षांपासून चर्चा सुरू असून सर्व जण त्या दृष्टीने मतदारसंघात पाय रोवत आहेत. दि. 4 जूनला लोकसभेचा कोणता उमेदवार विजयी होईल यापेक्षा या जिल्हा परिषद गटातून जास्त मताधिक्य असणार्या गटास जिल्हा परिषदेची निवडणूक सोपी जाणार हे मात्र नक्की.
हेही वाचा