पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर हे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात दोन टप्प्यांत निवडणुका होणार असून, पहिल्या टप्प्यात बारामती मतदारसंघाची, तर दुसर्या टप्प्यात पुणे, मावळ आणि शिरूर या मतदारसंघांची निवडणूक होणार आहे. बारामती लोकसभेसाठी दि.12 एप्रिल 2024 पासून तर पुणे, मावळ आणि शिरूर या मतदारसंघांसाठी दि.18 एप्रिल 2024 पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी रविवारी (दि.17) पत्रकार परिषदेत दिली.
लोकसभा निवडणुकीसंदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते.
डॉ. दिवसे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. निवडणुकीचे प्रशिक्षण कर्मचार्यांना देण्यात आले आहे. मतदान केंद्रांवर नागरिकांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये पिण्याचे पाणी, दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठी व्हीलचेअर, मदत कक्ष असणार आहे. तसेच, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे.
राज्यात मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात उमेदवार निवडणुकीत उभे करणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याविषयी विचारले असता, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे म्हणाले की, 24 बॅलेट युनिट जोडून 384 उमेदवार निवडणुकीत उभे राहिले, तर त्यांची निवडणूक ही ईव्हीएम यंत्राद्वारेच होईल. त्यापेक्षा अधिक उमेदवार रिंगणात आल्यास बॅलेट बुक छापावे लागेल. त्यासाठी प्रशासनाची संपूर्ण तायरी आहे, असे डॉ. दिवसे यांनी सांगितले.
गुन्हेगारी पार्श्वभूमी तसेच निवडणूक काळात शांतता भंग करण्याची शक्यता आहे अशांची यादी तयार केली आहे, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. अमितेश कुमार म्हणाले की, पुणे पोलिस आयुक्त कार्यक्षेत्रात तीन हजार 287 मतदान केंद्रे आहेत. त्यात पुणे, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांतील केंद्रांचा समावेश आहे. यामध्ये 16 अतिसंवेदनशील मतदान केंद्र असून, या केंद्रांसह एकूण केंद्रांच्या 50 टक्के केंद्रांचे वेब कास्टिंग केले जाणार आहे.
त्यावर नियंत्रण कक्षातून लक्ष ठेलवे जाईल. आवश्यक त्या ठिकाणी केंद्रीय सुरक्षा दल तैनात केले जाणार आहे. निवडणूक शांततेत आणि आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सात हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी ड्रग, दारू आणि रोख रकमेची वाहतूक रोखण्यासाठी विशेष नियोजन केले आहे. पोलिस कर्मचार्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकांची स्थापना केली आहे, असे अमितेश कुमार यांनी सांगितले.
जिल्ह्यात 20 संवेदनशील मतदान केंद्रे असून, या ठिकाणी आवश्यक खबरदारी घेण्यात येणार आहे. 3 हजार 941 मतदान केंद्रांवरून सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या साहाय्याने वेबकास्टिंग करण्यात येणार असून, नियंत्रण कक्षाद्वारे येथील मतदान प्रक्रियेचे अवलोकन करण्यात येईल. केंद्रीय सशस्त्र पोलिस बलाचे कर्मचारी आवश्यकतेनुसार तैनात करण्यात येतील. भोर तालुक्यात 32, खेड-आळंदी 5 आणि आंबेगाव तालुक्यात 2 अशा एकूण 39 ठिकाणी इंटरनेट व अन्य सुविधा नसलेले मतदान केंद्रे आहेत. त्या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात प्रत्येकी 21 आदर्श मतदान केंद्रे, महिला संचालित, दिव्यांग संचालित, युवकांद्वारे संचालित आणि विशेष मतदान केंद्रे असतील. याद्वारे मतदान केंद्रांवर चांगले वातावरण निर्माण करून मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, रॅम्प, स्वच्छतागृह, व्हीलचेअर, मतदार सुविधा केंद्र, पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि उन्हापासून संरक्षणासाठी मंडप किंवा छत असणार आहे.
जिल्ह्यात एकूण 82 लाख 24 हजार 423 मतदार आहेत. दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांसाठी मतदान केंद्रांवर विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. अशा मतदारांना रांगेत उभे न करता त्यांना मतदानासाठी सहकार्य करण्यात येईल. मतदान केंद्रावर येणे शक्य नसल्यास त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येईल.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुका निकोप वातावरणात आणि शांततेत पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. डॉ. दिवसे म्हणाले, राजकीय पक्षांनी भारत निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करावे. दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांना मतदान करण्यासाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहील, यावर भर देण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात शांततेच्या वातावरणात निवडणुका होण्याची परंपरा आहे. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी आणि मुक्त वातावरणात निवडणुका व्हाव्यात, यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पुणे ग्रामीण पोलिस विभागांतर्गत शिरूर, बारामती, मावळ असे तीन लोकसभा मतदारसंघ असून, 3 हजार 102 मतदान केंद्रे आहेत. याकरिता लागणारे पुरेसे मनुष्यबळ असून, बारामती व शिरूर लोकसभा निवडणुकीकरिता अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. या मतदारसंघात 5 संवदेनशील मतदान केंद्रे आहेत. जानेवारीपासून 22 अवैध शस्त्रधारकांकडून शस्त्रे जमा करण्यात आली असून, संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक आराखडा तयार करण्यात आला असून, विविध गुन्ह्यांतर्गत असलेल्या आरोपी तसेच अवैध शस्त्रधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात 1 हजार 854 मतदान केंद्रे असून, त्यात प्रामुख्याने मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे क्षेत्र आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने 1 डिसेंबर 2023 पासून आतार्यंत 2 हजार 500 पेक्षा अधिक आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई, एमपीडीएअंतर्गत 13, मोक्का कायद्यांतर्गत 18 संघटनांवर कारवाई करून 99 आरोपींना अटक तसेच 95 आरोपींना हद्दपार, शस्त्र जमा करणे, अशा कारवाया करण्यात आल्या आहेत, असे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.
हेही वाचा