नंदुरबार : डंपरच्या खाली येऊन विद्यार्थीनीचा मृत्यू; चालक ताब्यात | पुढारी

नंदुरबार : डंपरच्या खाली येऊन विद्यार्थीनीचा मृत्यू; चालक ताब्यात

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा
सायकलवरून क्लासला निघालेल्या 16 वर्षीय विद्यार्थिनीला भरधाव डंपरने धडक दिल्याने डंपरच्या चाकाखाली येऊन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नंदुरबार शहरातील धुळे चौफुलीवर घडली आहे. रस्त्याच्या दुर्दशाकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी, भ्रष्ट ठेकेदार आणि त्याकडे कानाडोळा करणारे लोकप्रतिनिधींमुळे हा अपघात झाल्याचे नागरिकांकडून बोलले जात असून अपघातस्थळी स्थानिक नागरिकांमधून अत्यंत प्रक्षोभक भावना उमटल्या.

याविषयीचे अधिक वृत्त असे की, मूळ निंभेल गावचे रहिवासी तथापि सध्या नंदुरबार शहरातील जयचंद नगर येथील रहिवाशी सतीश पाटील यांची मुलगी कुमारी डिंपल सतीश पाटील (वय वर्षे 16) रविवार (दि.१७) रोजी सकाळी साडेसात वाजता नेहमीप्रमाणे सायकल वरून साई क्लासेस येथे जाण्यासाठी निघाली. धुळे नंदुरबार रोड वरील धुळे चौफुलीवर ती आली असता अव्वल गाजी दर्ग्या कडून भरधाव वेगाने आलेल्या हायवा डपंरने (क्रमांक जी. जे 16 ए. डब्ल्यू 6688) तिला जोरदार धडक दिली. त्यामुळे सायकलवरून ती रस्त्यावर पडली त्याच डंपर खाली ती चिरडल्या गेली. भल्या मोठ्या हायवा डंम्परचे क्लिनर साईटचे पुढील चाक तिच्या अंगावरुन गेल्याने तिच्या पोटाला, पाठीला आणि हाता-पायांना गंभीर दुखापत झाली.

ही घटना पाहताच रस्त्यावरील लोक धावून आले आणि त्यांनी पोलिसांना तातडीने पाचारण करीत तिच्या घरी माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, मुलीचे वडील सतीश पाटील यांनी घटनास्थळी येऊन तातडीने नातेवाईकांच्या मदतीने रुग्णवाहिकेने मुलगी डिम्पल हिस निम्स हॉस्पिटल येथे नेले. तिथे डॉक्टरांनी डिम्पलला तपासून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितल्याने डिम्पलला पुन्हा रुग्णवाहिकेव्दारे सिव्हील हॉस्पीटल नंदुरबार येथे दाखल करण्यात आले. येथे कर्तव्यावरील डॉ. प्रज्ञा वळवी यांनी सकाळी 9.30 वाजता डिम्पल हिला मृत घोषित केले. तिच्या पालकांचा त्यावेळी केलेला आक्रोश उपस्थितांना हेलावून गेला. बेदरकारपणे रस्त्यावरुन जाणारी अवजड वाहतूक आणि मागील आठ वर्षापासून धुळे चौफुली वरील रखडलेली दुरुस्ती याबद्दल उपस्थितांमधून संतप्त भावना उमटल्या. दरम्यान मुलीचे वडील सतीश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपरचालक विनयकुमार रामचंद्र प्रसाद (वय 40 वर्षे, रा. अमरा, जि. रोहतास (बिहार राज्य) याला अटक करण्यात येऊन डंपर देखील जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नायक स्वप्निल शिरसाट करीत आहेत.

Dumper pudhari.news
धुळे : अपघातात मृत पावलेली डिंपल सतीश पाटील .

गुणवंत डिंपलच्या हातून महाराष्ट्रदिनी होणार होते ध्वजवंदन
सर्वसामान्य कुटुंबातली डिंपल पाटील ही अत्यंत अभ्यासू आणि गुणवंत विद्यार्थिनी म्हणून परिचित. होती. विद्यार्थिनींमध्ये ती कायम अव्वल गुणांनी शाळेत स्थान मिळवायची. गुणवत्तेमुळे शाळेतून तिला प्राधान्य दिल्याने महाराष्ट्रदिनी येत्या एक मे रोजी तिच्या हातून ध्वजवंदन केले जाणार होते, असे पाटील परिवाराशी संबंधित व्यक्तींकडून सांगण्यात आले. मात्र त्याआधीच काळाने घाला घातला आणि एक गुणवान विद्यार्थिनी हिरावून घेतली. याबद्दल तिच्या शाळेतील शिक्षकांनी दुःखद भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, धुळे चौफुली वरील अवजड वाहतुकीचे नियंत्रण करण्यात अपयशी ठरलेले अधिकारी आणि रस्त्याची दुर्दशा कायम ठेवणारे भ्रष्टाचारी यामुळेच डिंपलचा बळी  गेल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नंदुरबार धुळे रस्त्यावर धावणाऱ्या बेदरकार अवजड वाहतुकीला नियंत्रित कधी केले जाणार?  धुळे चौफुली वरची रस्त्याची दुर्दशा आणखी किती बळी घेणार? हा प्रश्न डिंपल पाटील हिच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Back to top button