Loksabha election | पुण्यात उभारणार इस्लामिक शैक्षणिक विद्यापीठ : अनिस सुंडके

Loksabha election | पुण्यात उभारणार इस्लामिक शैक्षणिक विद्यापीठ : अनिस सुंडके

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे हे जगात आपल्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक वैभवासाठी ओळखले जाते. पुण्याला विद्येचे माहेरघर तसेच सांस्कृतिक राजधानी म्हणूनदेखील ओळखले जाते. विविध धार्मिक सणदेखील पुण्यात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. पुण्याच्या या वैभवात भर पडावी म्हणून उत्तरप्रदेशातील देवबंद विद्यापीठाच्या धर्तीवर पुण्यात इस्लामिक धार्मिक अभ्यासाचे केंद्र उभारण्याचा मनसुबा एमआयएम पक्षाचे उमेदवार अनिस सुंडके यांनी जाहीर केला.

या इस्लामिक शैक्षणिक विद्यापीठात मुस्लिम विद्यार्थ्यांना इस्लाम धर्माची शिकवण तसेच इतर अभ्यासक्रमदेखील शिकवले जातील. ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट म्हणवल्या जाणार्‍या पुण्यामध्ये यामुळे आणखी भर पडणार आहे. पुण्यातील कॅम्प परिसरातील प्रचार रॅलीदरम्यान सुंडके यांनी उपस्थित मतदारांशी संवाद साधला.

मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी इस्लामचे शिकवण देण्यासाठी फारशा शिक्षण संस्था पुण्यामध्ये नाहीत. त्यामुळे जनतेने जर मला निवडून दिले, तर मी पहिले काम मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाची स्थापना करेन, असे अनिस सुंडके म्हणाले. कॅम्प परिसरातील रॅलीला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने कार्यकर्ते रॅलीमध्ये सामील झाले होते.

भाजपच्या पायाखालची वाळू सरकली

अनिल सुंडके यांच्या टिपू सुलतान यांचे स्मारक उभारण्याच्या वक्तव्यावरून भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी टिपू सुलतान आणि एमआयएम पक्षावर टीका केली होती. तसेच भाजप विकासाचे राजकारण करते या टीकेला प्रत्युत्तर देताना सुंडके म्हणाले, भाजप विकासाचे राजकारण करते असे मला बिलकूल वाटत नाही. कारण सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या प्रत्येक भाषणात मुस्लिम धर्मावर वारंवार टीका करत आहेत, याला धार्मिक राजकारण नाही म्हणायचे तर काय? भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून धार्मिक तेढ निर्माण होणारे वक्तव्य केली जात आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news