Lokasabha Election : पुण्यातील राजकीय वातावरण तापले

Lokasabha Election : पुण्यातील राजकीय वातावरण तापले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने, पुणे शहरातील भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांतील इच्छुकांची धावपळ वाढली आहे. उमेदवारी कोणाला मिळणार, याची अद्याप निश्चिती नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. इच्छुकांची एकमेकांविरुद्धची फलकबाजी, पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी, बूथपातळीपर्यंतची पक्षबांधणी यांना वेग आल्याने पुण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणुकीची तारीख पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यातील दोन्ही प्रमुख आघाड्यांतील जागा वाटप अजूनही चर्चेच्या पातळीवरच आहे.

आघाडीतील मित्रपक्षांची अधिक जागांची मागणी कशी पूर्ण करावयाची, या विवंचनेत मोठ्या पक्षांचे नेते आहेत. त्यामुळे सध्यातरी उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता खूपच धूसर आहे. भाजपचे प्रमुख इच्छुक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधातील एक फलक शहरात लागल्याचे सोशल मीडियावरून सर्वत्र पसरले, त्याचीच चर्चा होऊ लागली आहे. मात्र, मोहोळ यांनी त्याबाबत काहीही भाष्य केलेले नाही. ते गुरुवारी शिर्डीला गेले होते. भाजपचेच आणखी एक प्रबळ इच्छुक पक्षाचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक हेही मुंबईच पक्षश्रेष्ठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याची चर्चा कार्यकर्त्यांत सुरू होती. मात्र, या चर्चेचेही मुळीक यांनी खंडन केले. ते दिवसभर पुण्यातच असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केले.

भाजपच्या जागावाटपाबाबत अद्याप चर्चा सुरू असल्याने, सध्यातरी इच्छुकांनी शांत राहत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींवर भर दिल्याचे दिसून येते. अन्यही काही इच्छुक भाजपमध्ये असून, पक्षाच्या धक्कातंत्राने उमेदवार निवडीचा आपल्याला फायदा होईल, असा आशावाद ते बोलून दाखवत आहेत. काँग्रेसच्या बाजूने कसबा पेठ मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेस पक्षाने विधानसभा मतदारसंघनिहाय मेळावे घेण्यासही सुरुवात केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे युवानेते रोहित टिळक यांच्या नावाचीही चर्चा इच्छुक उमेदवार म्हणून सुरू झाली आहे. आघाडीतील जागावाटपाचा निर्णय झाल्यानंतरच काँग्रेसचा उमेदवार वीस मार्चपर्यंत ठरण्याची शक्यता असल्याचे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले.

अजित पवार आज दिल्लीला

भाजपसोबत आघाडीतील किमान सात ते आठ जागा मिळाव्यात, अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची इच्छा आहे. तेवढ्या जागा देण्याची भाजपची तयारी नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, तसेच भाजपच्या पक्षश्रेष्ठींशी बोलण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी (दि. 8) सकाळी तातडीने पुण्याहून दिल्लीला जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news