शिरूर : पुढारी वृत्तसेवा : सर्वत्र लोकसभेची धामधूम सुरू असताना चौथ्या टप्प्यात शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत असून मतदानाला 12 दिवस शिल्लक आहेत. असे असतानाही शिरूर तालुक्यात निवडणुकीबाबत उत्साह दिसत नाही. प्रचारासाठी बराच कालावधी दोन्ही उमेदवारांना मिळाला असला तरी कार्यकर्ते व मतदारांमध्ये उत्साह नाही. त्याचे एक कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न होणे हे होय, अशी चर्चा गावनेते आणि कार्यकर्त्यांमध्येच आहे. शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तसेच शिरूर नगरपालिकेच्या निवडणुका या दोन वर्षापासून प्रलंबित आहेत. या निवडणुका आज होतील, उद्या होतील यावर इच्छुक तग धरून होते; मात्र दोन वर्षांनंतर देखील निवडणुका न होता लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या.
परिणामी स्थानिक नेते व कार्यकर्ते यांना कोठेच संधी मिळाली नसल्याने ते लोकसभा निवडणुकीबाबत अनुत्साही दिसत आहेत.
ग्रामीण भागाचा आत्मा असलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद या संस्थांच्या निवडणुका न झाल्याने कार्यकर्ते प्रचंड नाराज असून निवडणुकीत हिरहिरीने भाग घेताना दिसत नाहीत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे माजी पदाधिकारी देखील या निवडणुकीपासून लांब गेल्याचे चित्र सध्या दिसत आहे. शिरूर शहरात सुध्दा हीच परिस्थिती असून माजी नगरसेवक कुठल्याही प्रचार फेरीत दिसत नाहीत.
त्यातच राज्यातील कुठल्याच मोठ्या नेत्याची सभा न झाल्याने निवडणुकीचे वातावरण तयार होण्यास अजून देखील वेळ लागणार आहे.
राज्यात होत असलेल्या सर्वच पक्षातील फाटाफुटीमुळे कोण कुठल्या पक्षात जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे सर्वपक्षीय पदाधिकारी संभ्रमात असून आपण कशाला वाईटपणा घ्यायचा, उद्या ते एकत्र होतील अशी चर्चा शहरात रंगताना दिसत आहे.
हेही वाचा