LokSabha Elections 2024 Result : डॉ. अमोल कोल्हेंनी राखला शिरूरचा गड

LokSabha Elections 2024 Result : डॉ. अमोल कोल्हेंनी राखला शिरूरचा गड

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शिरूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी 28 व्या अंतिम फेरीअखेर 1 लाख 41 हजार मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. शिरूर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गड मानला जातो. शरद पवार आणि अजित पवार या दोघांचाही या भागात प्रभाव आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मूळचे शिवसेनेचे असलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या निवडणुकी आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली. त्यामुळे डॉ. कोल्हे आणि आढळराव पाटील यांच्यातील लढत प्रतिष्ठेची झाली.

या निवडणुकीसाठी आढळराव पाटील यांच्या प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः लक्ष घातले होते. पक्षफुटीमुळे शरद पवार यांनीही या निवडणुकीकडे विशेष लक्ष देऊन प्रचारसभा घेतल्या. प्रचारात वैयक्तिक पातळीवर टीका-टिप्पणी झाली. तसेच डॉ. कोल्हे यांना पाडून दाखवण्याचे आव्हान अजित पवार यांनी घेतल्याने मोठी चुरस निर्माण होईल असे वाटले होते. प्रत्यक्षात मतदारांनी त्यांचा कौल डॉ. अमोल कोल्हे यांच्या बाजूने दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले. रांजणगाव एमआयडीसीमधील वखार महामंडळाच्या शेडमध्ये ही मतमोजणी झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच डॉ. कोल्हे यांनी आघाडी घेतली. त्यानंतर काही फेर्‍यांमध्ये आढळराव पाटील यांचा मतटक्का केवळ एक हजारने वाढला. मात्र ती आघाडी तोडू शकले नाहीत.

त्यामुळे डॉ. कोल्हे यांची आघाडी कायम राहिली. मतमोजणीच्या एकूण 28 फेर्‍यांमध्ये डॉ. कोल्हे यांनी आघाडी टिकवली. 28 व्या फेरीअखेर अमोल कोल्हे यांना 6 लाख 98 हजार 800 तर आढळराव पाटील यांना 5 लाख 57 हजार 785 मते मिळाली. 2019 च्या निवडणुकीत डॉ. कोल्हे यांना 58 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. तर या निवडणुकीत त्यांना 1 लाख 41 हजारांचे मताधिक्य मिळाल्याने त्यांच्या मताधिक्यात तिपटीने वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही निवडणूक चुरशीची होण्याचा कयास बांधला जात असला, तरी प्रत्यक्षात मिळालेले मताधिक्य पाहता निवडणूक एकतर्फीच झाल्याचे दिसून आले. या निवडणुकीपूर्वी आढळराव पाटील यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे जाहीर केले होते. या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता आढळराव पाटील यांच्या भविष्यातील राजकीय कारकिर्दीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. जनतेने निवडणूक हाती घेतल्याने, निवडणुकीत दीड लाखांच्य मताधिक्याने विजय मिळाला. यानिमित्ताने कोणी कितीही मोठ्याने दटावण्याचे काम केले तरी जनता त्यांना उत्तर देते, हे निकालातून दिसून आले. शरद पवार यांचा करिष्मा अजूनही कायम असल्याचे पुन्हा एकदा देशाने पाहिले. या विजयाचे श्रेय महाविकास आघाडीचे सर्व नेते, सर्व घटक पक्ष, कार्यकर्ते, शिरूर मतदारसंघातील जनतेला जाते.

– डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news