नारायणगाव : स्थानिक नागरिकांचा यू-टर्न; अधिकार्‍यांसमोर प्रश्नचिन्ह, वारुळवाडी-गुंजाळवाडी रस्त्यावरील अतिक्रमण प्रकरण

नारायणगाव : स्थानिक नागरिकांचा यू-टर्न; अधिकार्‍यांसमोर प्रश्नचिन्ह, वारुळवाडी-गुंजाळवाडी रस्त्यावरील अतिक्रमण प्रकरण
Published on
Updated on

नारायणगाव, पुढारी वृत्तसेवा: वारुळवाडी-गुंजाळवाडी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये असताना ज्यांची अतिक्रमणे या रस्त्यावर आहेत, त्यांनी बचावात्मक पवित्रा घेऊन 'आम्ही अतिक्रमणात नाही व आमचे या रस्त्यावर व्यावसायिक गाळे, घरे आहेत. अतिक्रमण काढल्यास आम्ही बेघर होऊन आमचे संसार उघड्यावर येतील. काही समाजकंटकांनी शासनाला चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली असून, चालकांच्या बेपर्वाईमुळे अपघात झाल्यास बांधकाम खात्याचा कुठलाही संबंध नसेल,' अशा आशयाचे निवेदन जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायत वारुळवाडी यांना दिले आहे.

वारुळवाडी-गुंजाळवाडी रोडवर जुन्या ग्रामपंचायत इमारतीसमोर पाच महिन्यांपूर्वी घोडेगाव येथील महिलेचा, त्यानंतर 14 नोव्हेंबरला धोंडकरवाडी येथील महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे हे दोन्ही अपघात झाल्याने संतप्त नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता ज्ञानदेव रायकर, नारायणगाव, वारुळवाडीचे सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत सभा घेऊन या रस्त्यावरील अतिक्रमण काढून त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी भूमिका घेतली होती. या वेळी राजे ग्रुपचे जुबेर शेख यांनी पोलिस स्टेशनला या अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे निवेदनही दिले होते. या वेळी रायकर यांनी तिसर्‍याच दिवशी या रस्त्याच्या साइडपट्ट्या भरण्याच्या कामाला सुरुवात केल्याने वारुळवाडीमधील ज्या धनदांडग्यांचे व्यावसायिक गाळे, संरक्षक भिंत व जागा जात आहे अशा लोकांनी यू-टर्न घेऊन या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण नाही, असे सांगत निवेदन दिले आहे.

ज्या नागरिकांचे या रस्त्यालगत गाळे, जागा नाही त्यांनीही निवेदनावर स्वाक्षरी केली आहे; तर काहींनी या स्वाक्षर्‍या रात्री घेण्यात आलेल्या आहेत. निवेदन नंतर लिहिले आहे व त्यात काय मजकूर आहे, हे आम्हाला माहीत नाही, असे सांगितले.

मुळात या रस्त्यालगत ज्या धनदांडग्यांचे अतिक्रमणात बांधकाम आहे, ते काढले तर नुकसान होईल अशांनी ही भूमिका घेतल्याचे नागरिक बोलत आहेत. वारंवार जीवघेणा अपघात होणार्‍या या रस्त्यावरील अतिक्रमण काढणे ही काळाची गरज आहे व न काढल्यास अपघातांची मालिका चालूच राहणार आहे. मग जबाबदार कुणाला धरायचे? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

सरपंचांच्या भूमिकेबाबत संभ्रम

जून महिन्यात याच रस्त्यादरम्यान जुन्या ग्रामपंचायतीसमोर एका महिलेचा अपघाती मृत्यू झाला, त्या वेळेला वारुळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच राजेंद्र मेहेर यांनी आग्रही भूमिका घेऊन रस्त्यालगत असणारे अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने काढले होते. त्या वेळी काही गरिबांचे नुकसान झाले. पण, ग्रा. पं.चे कौतुक करण्यात आले. मात्र, आता तेच सरपंच मेहेर काही लोकांच्या अट्टहासापोटी पुढील अतिक्रमण न काढण्याबाबत देण्यात आलेल्या निवेदनावर स्वाक्षरी करून पाठिंबा दर्शवतात. त्यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे लोकांमधून संभ्रम निर्माण होऊन उलटसुलट चर्चा होताना दिसत आहे.

या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. अनधिकृत व्यावसायिक गाळे व इमारती आहेत. अपघातानंतर अतिक्रमण काढण्याबाबत नागरिकांची आग्रही भूमिका होती. मात्र, आता काही स्थानिक लोक दबावतंत्राचा वापर करीत आहेत. अशा परिस्थितीत अधिकार्‍याने कसे वागायचे ? मी यापुढे कुठल्याही दडपणाला बळी न पडता अतिक्रमण काढणारच; मग भले माझ्या नोकरीबाबत प्रश्न निर्माण झाला तरी चालेल. या रस्त्यावरील अतिक्रमण करणार्‍यांना नोटीस काढण्यात आली आहे.
– ज्ञानदेव रायकर, सहायक अभियंता

वारुळवाडी-गुंजाळवाडी रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक ग्रामपंचायतीमधील प्रशासकीय अधिकारी हे नियमानुसार जो निर्णय घेतील तो योग्यच असेल. अतिक्रमणाबाबत मी कोणालाही पाठीशी घालणार नाही. रस्त्यावरील वाढती वाहतूक पाहता सुसज्ज व सुरक्षित रस्ता होणे, ही काळाची गरज आहे.
– अतुल बेनके, आमदार, जुन्नर तालुका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news