

उमेश काळे
टाकळी भीमा: शिरूर तालुक्यात येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या 16 गणांत शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांच्याबरोबरच भाजपने संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे. भाजपचे आव्हान मोडीत काढण्याचे मोठे आव्हान आ. माऊली कटकेंसमोर आहे.
यापूर्वी तालुक्याला भाजपचा एकच अध्यक्ष असायचा. हा पायंडा मोडीत काढत तालुक्याला तीन अध्यक्ष नियुक्त करीत भाजपने निवडणुकीच्या तोंडावर नवीन पॅटर्न राबविला आहे. 70 बूथमागे एक अध्यक्ष, या धोरणानुसार भाजपने निवड केली आहे. मंडलनिहाय अध्यक्ष जयेश शिंदे, राहुल पाचरणे आणि संयोगिता पलांडे यांनी जिल्हा परिषद गटात गावभेट दौरे सुरू केले आहेत. अध्यक्षपद मिळाल्याने सत्कार समारंभानिमित्त वातावरण तापवले जात आहे. (Latest Pune News)
चार ते पाच दिवसांपूर्वीच शिरूर-हवेलीचे नेते, पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने शिरूर तालुक्यामधील भाजप पक्षात नवचैतन्य आले आहे. जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद आणि आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांच्या साथीने शिरूर खरेदी-विक्री संघाची निवडणूक जिंकल्यामुळे शिरूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीची ताकद शिरूर तालुक्यात वाढलेली दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीत माजी आमदार अशोक पवार यांचा पराभव झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे. शिरूर तालुक्यात जिल्हा परिषद गटनिहाय पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी काँग्रेस कमी पडत आहे.
परिणामी, येणार्या निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार अशोक पवार, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव, दिलीप मोकाशी, काकासाहेब कोरेकर, प्रा. कळस्कर यांना पक्षाची झालेली पडझड कार्यकर्त्यांना आणि आलेली मरगळ झटकून तरुणांची बांधणी करीत पुन्हा उभारी द्यावी लागणार आहे.
भाजपचे माजी आमदार दिवंगत बाबूराव पाचारणे यांचे खंदे समर्थक तसेच घोडगंगा कारखान्याचे माजी अध्यक्ष दादा पाटील फराटे, तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, पुणे जिल्हा युवकचे माजी अध्यक्ष स्वप्निल गायकवाड, कात्रज दूध संघाचे अध्यक्ष स्वप्निल ढमढेरे यांनी विधानसभेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे.
हा पक्षप्रवेश म्हणजे माजी आमदार अशोक पवार यांना शह देऊन त्यांच्याविरोधात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त संख्येने पदाधिकारी निवडून आणण्याचा मुख्य प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, माजी आमदार पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर सत्ताधारी पदाधिकार्यांचे अस्तित्व मोडीत काढण्यासाठी आता तालुक्यातील विकासाला प्राधान्य देत थेट जनतेशी पुन्हा संपर्क वाढविल्याने याचा फायदा त्यांना येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होईल का? याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
मंगलदास बांदल, हरिश येवले यांच्या भूमिकेकडे लक्ष
शिरूर तालुक्यात आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये स्वतःचा करिष्मा गाजवलेले पुणे जिल्हा बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल हे सध्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात असून, प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती दिसत आहे. ते येत्या निवडणुकीत काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. शिरूर तालुक्यातील जनता प्रस्थापित राजकारण्यांना कंटाळली असून, पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती हरिश येवले यांच्यासारख्या नवीन कोर्या पाटीच्या उमेदवारांना पसंती मिळेल, असे तालुक्यातील राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे.