पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील दोन्ही मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर प्रवाशांना मेट्रो मार्गापर्यंत सुलभरीत्या जाता यावे, यासाठी महापालिकेने टीओडी झोनमध्ये लोकल एरिया प्लॅनिंग सुरू केले आहे. पहिल्या टप्यात चार मेट्रो स्टेशन परिसरातील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात येत असून, त्यानंतर टप्याटप्याने अन्य सर्व झोनचे नियोजन करण्यात येणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील दोन मार्गांवर जवळपास 27 किमी मेट्रो मार्ग सुरू झाला आहे, तर शिवाजीनगर ते स्वारगेट मार्गावरील भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्यात आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावरील 22 किमी मेट्रोचे कामही प्रगतिपथावर आहे.
सार्वजनिक वाहतूकव्यवस्था बळकट करण्यासाठी राज्य शासनाने मेट्रो स्टेशनच्या परिसरात एक किमीच्या परिघात ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपेंट (टीओडी) झोन करण्यात आले आहेत. या झोनमध्ये अधिकाधिक लोकवस्ती वाढून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यात यावा, या उद्देशाने हा झोन विकसित करण्यात आला असून, त्यामधून अतिरिक्त एफएसआयची तरतूदसह अन्य सुविधा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, मेट्रोचा वापर जास्तीत जास्त नागरिकांनी करावा यासाठी या टीओडी झोनमध्ये पार्किंगसह पीएमपी बसेस, रिक्षा, सायकल यांच्या अधिकाधिक सुविधा नागरिकांना कशा उपलब्ध करून देता येतील या दृष्टीने महापालिकेने लोकल एरिया प्लॅनिंग सुरू केले आहे. त्यात पहिल्या टप्प्यात स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन आणि वनाज या चार मेट्रो स्टेशनच्याप्ओटीडी झोन त्यासंबंधीचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.
टीओडीच्या संपूर्ण झोनचे मार्किंग करण्यात येत आहे. हा झोन निश्चित झाल्यानंतर त्या परिसरात पार्किंगची सुविधा कशी उपलब्ध करून देता येईल. मेट्रो स्टेशनपर्यंत पीएमपीच्या माध्यमातून नागरिकांना कशी सुविधा देता येईल, रिक्षा-सायकल आदी व्यवस्था कशा उभारता येईल यासंबंधीचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी एका खासगी सल्लागार संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे.
हेही वाचा